वाघोली – भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी 2024 या नवीन वर्षात पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा उत्तर विभागाच्या सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून एकमेकांचा सन्मान करतेवेळी पुस्तक भेट देण्याचा अनोखा उपक्रम जिल्हाभर राबवणार असल्याची माहिती पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप सातव यांनी दिली.
याबाबत संदीप सातव यांनी सांगितले की, भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी पुण्यात राबविलेला पुस्तक महोत्सव हा उपक्रम देशभरात नावारुपास आला आहे. पुणे पुस्तक महोत्सवात चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाले आहेत. राजेश पांडे यांनी या पुस्तक महोत्सवाचे अतिशय नेटके आयोजन करून एक आदर्श उभा केला आहे.
राजेश पांडे यांची प्रेरणा घेऊन पुणे जिल्हा ग्रामीण मधील सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, आजी माजी पदाधिकारी, तसेच सेवा सहकारी संस्था पदाधिकारी, व नागरिकांचा सन्मान करते वेळी एकमेकांना वाचन संस्कृतीचा अनमोल ठेवा म्हणून ओळखली जाणारी विविध लेखक, साहित्यिकांची पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृती वृद्धिंगत करावी, असे आवाहन संदीप सातव यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना केले .
येत्या 2024 मध्ये हा उपक्रम राबवून जमा झालेली पुस्तके विविध दुर्गम भागातील शाळा, महाविद्यालय तसेच वाचनालये यांना वाटप करण्यात येणार असल्याचे सातव यांनी सांगितले आहे. पुस्तक भेट उपक्रम वाचन संस्कृतीचा अनमोल ठेवा जपणारा उपक्रम म्हणून नावारूपास यावा यासाठी जास्तीत जास्त प्रबोधन करणार असल्याचे देखील संदीप सातव यांनी सांगितले आहे.