नवी दिल्ली – युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी मॉस्कोवर आर्थिक निर्बंध लादले तरीही भारताच्या रशियाबरोबरच्या द्विपक्षीय देयकांवर त्याचा परिणाम होणार नाही असा दावा भारत सरकारच्या सूत्रांनी केला आहे. भारत आणि रशिया द्विपक्षीय पेमेंट भारतीय रुपयात केले जाते.
आयात आणि निर्यात या दोन्हीसाठी तसेच शिपमेंटसाठी रूपयामध्ये पैसे दिले जातात किंवा घेतले जातात. त्यामुळे, विनिमय दरातील चढउतार वगळता रशियावरील संभाव्य निर्बंधांचा या पेमेंटवर परिणाम संभवत नाही, असे संबंधीत सूत्रांचे म्हणणे आहे. रशिया हा भारताला संरक्षण उत्पादने आणि उपकरणे पुरविणारा सर्वात मोठा पुरवठादार आहे.
भारत आणि रशियामधील द्विपक्षीय व्यापार सध्या 9.4 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे. रशियाकडून भारतात आयात केल्या जाणाऱ्या वस्तुंमध्ये इंधन, खनिज तेल, मोती, हिरे-माणके, अणुभट्ट्यांची सामग्री, बॉयलर यंत्रसामग्री,इलेक्ट्रिकल मशिनरी, खते
आणि यांत्रिक उपकरणे यांचा समावेश होतो.
भारतातून रशियाला निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तूंमध्ये फार्मास्युटिकल उत्पादने, इलेक्ट्रिकल मशिनरी आणि उपकरणे, सेंद्रिय रसायने आणि वाहने यांचा समावेश होतो. या आधीही इराणवर जगातल्या अन्य देशांनी निर्बंध जारी केल्यानंतर भारत आणि इराण यांच्या मधली भारतीय चलनातील द्विपक्षीय पेमेंट व्यवस्था सुरूच राहिली होती. तशीच पद्धत आता रशियाबरोबरही केली जाऊ शकते असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे.