पुणे(प्रतिनिधी) – व्याजावर दिलेल्या पैशांच्या वादातून युवकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. याप्रकरणी आणखी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरद राजेश म्हेत्रे (रा.गुरुवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. म्हेत्रेच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार तरुण रास्ता पेठेत राहायला आहे. तो आणि म्हेत्रे दोघे मित्र आहेत. तक्रारदाराने गेल्या काही महिन्यात म्हेत्रेकडून टप्याटप्याने अडीच लाख रुपये हातउसने घेतले होते. म्हेत्रेने त्याला दहा टक्के व्याजाने अडीच लाख रुपये दिले होते. म्हेत्रेने पैसे मागतल्यानंतर तक्रारदार युवकाने पैसे लगेचच देता येणार नाही, असे सांगितले.
दरम्यान, तक्रारदार तरुणाने त्याचा मोबाइल क्रमांक बंद ठेवल्याने म्हेत्रे आणि त्याचा बरोबर असलेला साथीदार तक्रारदाराच्या घरी गेला. म्हेत्रे आणि साथीदाराने तरुणाला धनकवडीतील आंबेगाव परिसरातील सदनिकेत डांबून ठेवले. त्याला तेथे मारहाण केली. दुसऱ्या दिवशी त्याला सोडून देण्यात आले. तक्रारदार युवकाने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये म्हेत्रे आणि साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक विवेक पाडवी तपास करत आहेत.
फिर्यादी तरुण ड्रायफुट व मसाले कमिशन एजंट म्हणून काम करतो. त्याला दिनेश खंडेलवाल नावाच्या ओळखीच्या व्यक्तीने वरद म्हेत्रेकडून अडीच लाख रुपये घेऊन दिले होते. व्यवहार क्लिअर झाल्यानंतरही दोघे आणखी पैशाची मागणी करत होते. एके दिवशी फिर्यादीला जबरदस्तीने आंबेगावात एका सदनिकेत बोलावून डांबून मारहाण करण्यात आली. फिर्यादीच्या बहिणीने मध्यस्थी केल्यावर त्याला सोडण्यात आले होते. यानंतरही आरोपी त्याच्या घराबाहेर येऊन सातत्याने त्याला पैशासाठी तगादा लावत होते.