सोशल मीडिया, मोबाईल, टेलिफोन याच्या आधी माणसांना एकमेकांशी जोडून ठेवणारं, शरीराने जरी दूर असले तरी प्रेमाच्या धाग्याने एकमेकांना बांधून ठेवणारं माध्यम म्हणजे पत्र. पूर्वी गावात पोस्टमन आला की सगळं गाव आनंदाने खुलून जायचं. आपल्या परदेशातल्या मुलाचं पत्र असेल, आपल्या ताईदादाचं पत्र असेल, सासरी गेलेल्या मुलींचं पत्र असेल या आशेने प्रत्येकजण पोस्टमनकाका, पोस्टमनदादांची आतुरतेने वाट पाहायचा.
कालांतराने मेसेजिंग, सोशल मीडियाच्या जमान्यात ही पत्रसंस्कृती मागे पडत गेली पण तरीही आजही हे पोस्टमनकाका नेटाने आपलं काम करत आहेत. अशाच एका महिला पोस्टमनबद्दल आजच्या महिला दिनानिमित्त आपण जाणून घेणार आहोत. यांचं नाव आहे मीना बाळासाहेब कोरडे. मीना गेली १२ वर्षे पोस्ट खात्यात कार्यरत आहेत.सध्या त्या डेक्कन पोस्ट ऑफिसमध्ये काम करत आहेत.
पोस्टमनकाकांसारखंच या ताईसुद्धा सायकलवरून पत्र ठिकठिकाणी पोचवण्याचे काम करतात. मीना यांचे पती बाळासाहेब कोरडे हेही पोस्टमन म्हणून काम करत आहेत. दहावीपर्यंत शिकलेल्या मीनाताईंनी काही काळ तात्पुरत्या तत्वावर काम केले पण गेल्या काही वर्षांपूर्वी त्या कायमस्वरूपी झाल्या आहेत. सुरुवातीला नवरा बायकोच्या तुटपुंज्या पगारावर घर चालवणे कठीण होते. पण हे आव्हानही मीनाताईंना स्वीकारलं आणि संसाराचा गाडा सुरळीत चालवला आणि चालवत आहेत. त्यांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत. मुलीने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं आहे तर दोन्ही मुले सध्या उच्च शिक्षण घेत आहेत. सायकल चालवून पाय दुखणे, अंग दुखणे या रोजच्या समस्या असल्या तरीही घरी आल्यावर नव्या जोमाने घरच्या कामांना उभं राहायचं. यात पती आणि मुलांचीही त्यांना साथ आहे. नयना हुंडारे आणि नयना कोल्हटकर या दोघीसुद्धा हेच काम करत आहेत. अजून कित्येक अशा असतील ज्यांच्यापर्यंत आपण अजून पोहचू शकलो नाही.
आज प्रत्येक क्षेत्रात महिला आणि पुरुष एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. भविष्यात महिला अजून पुढे जातील. आपलं अस्तित्व सिद्ध करतील. आज मीनाताईंना भेटल्यावर एक खंत अशी वाटली की त्यांना म्हणायचं काय? पोस्टमन हा पुल्लिंगी शब्द आहे. पोस्टाचा माणूस म्हणजे पोस्टमन. पण याच पदासाठी स्त्रीलिंगी शब्द काय? पोस्टवुमन की अजून काही?
अलिप्ततावादी राष्ट्रांची एक परिषद इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारतात झाली होती. या परिषदेचे अध्यक्ष त्यांना चेअरमन म्हटले जाई. परंतु इंदिरा गांधी ज्यावेळी या परिषदेच्या अध्यक्षा झाल्या त्यावेळी त्यांना चेअरमन या शब्दाचे चेअरपर्सन करण्यात आले. त्याचप्रमाणे आता प्रत्येक क्षेत्रात पदांची नावे पुल्लिंगी तसेच स्त्रीलिंगी सुद्धा असावीत आणि ती रूढ व्हावीत अशी आशा आजच्या महिला दिनानिमित्त करूया. मीनाताईंसारख्या प्रेरणादायी महिलांना सलाम करूया आणि या महिला दिनी समाजासोबतच साहित्यातही स्त्रियांसाठी वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहूया.
महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
– वैष्णवी सविता सुनील,
कॉलेज रिपोर्टर,
संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ