पिंपळगाव माळवी येथील घटना : एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नगर – बारा महिन्यांत भागीदार संस्थेमध्ये ठेव ठेवून त्याची दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून सव्वासात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये विकास वसंत कराळे (रा. आगडगाव, ता. नगर), पांडुरंग वाडगे (रा. रेल्वेस्टेशन, नगर), अनिल काकडे, महावीर आयतावडे (रा. कर्नाटक), रमेश थोरात (रा. भिंगार), परमानंद पवार (रा. औरंगाबाद) यांचा समावेश आहे. सहा जणांनी आदेश रामकृष्ण गायकवाड (रा. पिंपळगाव माळवी, ता. नगर) यांना त्यांच्या ठेवीची वर्षातच दामदुप्पट देण्याचे आमिष दाखविले. संस्थेचे बनावट कागदपत्र तयार करून विश्वास संपादन करून 7 लाख 20 हजार रुपयांची रक्कम घेतली. प्रत्यक्षात त्या रकमेची परतफेड न करता फसवणूक केली. 8 फेब्रुवारी 2019 ते 10 एप्रिल 2019 दरम्यान हे पैसे घेण्यात आले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आदेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार दळवी हे करीत आहेत.