बीजिंग – जगाला करोनाचा महाप्रसाद देणाऱ्या चीनमधून आणखी एक नवी डोकेदुखी समोर आली आहे. एका समोर आलेल्या बातमीनुसार येथे एक गट गेल्या काही महिन्यांपासून बनावट लस बनवत आहेत. लोकांच्या भीतीचा फायदा उचलत हा गट लशीच्या नावावर इन्जेक्शनमध्ये मिठाचं पाणी भरुन विकत आहेत. चीनच्या सरकारी मीडियानेच याबाबतची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही गॅंग गेल्या सप्टेंबरपासून बनावट लस बनवत आहे.
चीनमधील सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआनुसार, अनेक शहरांमध्ये हा धंदा चालवण्यात येत आहे. पोलिसांनी जियांगसू, बीजिंग आणि शानडोंगमध्ये 80 पेक्षा अधिक लोकांना या प्रकरणी अटक केली आहे. या लोकांनी आतापर्यंत 3000 पेक्षा जास्त बनावटी लस बनवल्या आहेत. शिन्हुआने सांगितलं की, चीनचं पब्लिक सिक्योरिटी मंत्रालय या प्रकरणाचा तपास करत आहे. बनावट लस बनवणे आणि ती विकण्याचे हे प्रकरण तेथील सरकारने गांभीर्याने घेतले आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरपासून हे लोक बनावट लस विकत आहेत. बाजारात मिठाचं पाणी भरलेले इन्जेक्शन विकून यांनी बक्कळ पैसा कमावला. करोना लसीच्या नावावर या गॅंगने मोठ्या प्रमाणात बनावट लस विकली आणि पैसा कमावला.
करोना विषाणूसाठी चीनने दोन लस तयार केल्या. सिनोवॅक आणि सिनोफार्म कंपन्यांनी या लसी तयार केल्या आहेत. ही लस चीनशिवाय तुर्कीसह अनेक देशांमध्ये पाठवण्यात आली आहे. दोन्ही कंपन्यांनी सुरुवातीला दावा केला होता की त्यांची लस करोनाशी लढण्यात 78 टक्के उपयुक्त आहे. पण, नंतर ब्राझिलमध्ये झालेल्या ट्रायलमध्ये सिनोवॅक फक्त 50.38 टक्के प्रभावी ठरली. त्यानंतर अनेक दिवसांनी लसीच्या ऑर्डरची समिक्षा करण्यास सुरुवात केली. चीनच्या सरकारी कंपन्याद्वारे बनलेल्या सिनोफार्म लशीला ट्रायलदरम्यान 79.34 टक्के असरदार मानलं गेलं.