कोलकाता – प. बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. टीएमसीचे आमदार दीपक हल्दर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीसाठी हा मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
दीपक हल्दर हे डायमंड हार्बर येथील आमदार आहेत. त्यांनी सोमवारी ममता बॅनर्जी यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षांतर्गत कुरबुरीतून त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. टीएमसीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हल्दर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपमध्ये हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच आमदार असतानाही सत्ताधारी पक्षातून अनेक नेते भाजपमध्ये येत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
46 दिवसात 11 नेते बाहेर
हल्दर यांच्यामुळे टीएमसी सोडून जाणाऱ्या नेत्यांची संख्या 11 झाली आहे. गेल्या 46 दिवसात 11 नेत्यांनी टीएमसीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे टीएमसीचे धाबे दणाणले आहे. येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन केलं जाणार आहे. त्यावेळीही टीएमसीमधून अनेक नेते भाजपमध्ये सहभागी होतील, असा दावा करण्यात आला आहे.