मुंबई – करोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे सरलेल्या वर्षात भारतातील बांधकाम साहित्याच्या विक्रीवर 8 टक्के परिणाम झाला असल्याचे हे साहित्य निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या संघटनेने म्हटले आहे. 2021-22 या कालखंडामध्ये बांधकामा संदर्भातील मोठ्या उपकरणाची विक्रि 85,385 युनिट एवढी झाली.
इंडियन कन्ट्रक्शन इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2020-21 मध्ये 92,470 युनिट विक्री झाली होती. या साहित्य प्रकारात अर्थ मुव्हींग इक्विपमेंटचा जास्त प्रमाणात समावेश होतो. याच उपकरणाच्या विक्रीवर सर्वात जास्त परिणाम झाला असल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे या कालावधीमध्ये मटेरियल हॅंडलींग, मटेरियल प्रोसेसिंग प्रकारातील उपकरणांच्या विक्रीत थोडीफार वाढ झाली. त्याचबरोबर बांधकाम साहित्याच्या निर्यातीतही या वर्षात 60 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे दिसून आले. करोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेबरोबर या कालावधीत पुरवठयावर आणि वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे बांधकामाचा वेग कमी झाला.
त्यामुळे या साहित्याच्या विक्रीवर परिणाम झाला असल्याचे या संघटनेने स्पष्ट केले आहे. आगामी काळाबाबत ही संघटना आशावादी आहे. कारण एक तर निर्यात वाढत राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सरकारने काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केले आहेत. त्यामध्ये बांधकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी समावेश आहे.