कोपरगाव – कोपरगाव व शिर्डी परिसरात बनावट देशी दारू विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव विभागाने छापा टाकत कारवाई केली. एकाला ताब्यात घेतले तर एक आरोपी फरार आहे.
राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना वावी (राहाता रोड), वेसगाव शिवार (ता. कोपरगाव)या ठिकाणी हॉटेल जय मल्हारमध्ये बनावट देशी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच याठिकाणी छापा टाकला. जालिंदर गोरक्षनाथ चितळकर (रा. सोयगांव, ता. कोपरगाव) याकडे अवैद्य देशी व विदेशी मद्य मिळून आले. त् देशी दारूच्या बाटल्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. विदेशी दारुचे 1.5 बॉक्स व देशी दारु भिंगरी संत्राचे 4 बॉक्स तसेच एक मोबाईल, असा एकूण 49 हजार 220 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात येऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.
अटक आरोपी व फरार आरोपी भाऊसाहेब साहेबराव जगताप विरुध्द महाराष्ट्र दारुबंधी कायदा 1949 चे कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. न्यायालयाने आरोपीला 25 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बनावट देशी दारू उपलब्ध करून ढाबे व टपऱ्यावरती विक्री करणारा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब साहेबराव जगताप हा फरार आहे. त्याचा शोध राज्य उत्पादन शुल्क विभाग घेत आहेत.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रमोद सोनोने, उपअधीक्षक सुजीत पाटील, कोपरगाव निरीक्षक एस.एस.हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस. आर. शेलार, जी. एन. नायकोडी, व्ही एम आभाळे, भाउसाहेब भोर, खलील शेख, नारायण ठुबे, सुधीर नागरे, तसेच सचिन बटुळे, अमीन सय्यद, वर्षा जाधव, वाहनचालक विजय पाटोळे यांच्या पथकाने केली आहे.