IND vs NZ T20 – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या २७ जानेवारीपासून तीन सामन्याच्या टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रांचीच्या मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय संघाने आगोदरच पाहुण्या संघाविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली आहे. तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवले आणि मालिका ३-० ने खिशात घातली. यानंतर आता हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारताची युवा सेना टी-२० मालिकेत यश मिळवण्यास तयार आहे .
दरम्यान, भारतीय संघाचा सलामीचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड हा या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला त्याच्या जाग्यावर दुसऱ्या खेळाडूला खेळवावे लागणार आहे. ऋतुराज सध्याच्या रणजी करंडक हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये खेळात होता. त्याने १७ जानेवारीला हैदराबाद संघाविरुद्ध रणजी करंडकाचा सामना खेळला होता. मात्र त्या सामन्यात आपल्या फलंदाजीने काही खास खामगिरी करता आली नव्हती. त्या सामन्यानंतर ऋतुराजने खांद्याला दुखापत झाली असून त्रास होत असल्याचे बोर्डाकडे कळवले होते.
ऋतुराज गायकवाड त्याच्या दुखापतीमुळे आता न्यूझीलंडविरुद्ध उद्यापासून सुरु होणाऱ्या टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडण्याची त्याची ही पहिलीच वेळ नाही. या अगोदरही तो दुखापतीमुळे मागील वर्षीच्या श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेतील सामनेही खेळू शकला नव्हता. त्याचबरोबर कोविडमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेलाही तो मुकला होता. ऋतुराज न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेतून बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी इतर कोणत्याही खेळाडूचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे संघात बऱ्याच काळानंतर पुनरागमन करत असलेल्या पृथ्वी शॉला सलामीला खेळण्याची संधी मिळू शकते.
Ruturaj Gaikwad ruled out of the New Zealand T20i series due to wrist pain. (Reported by Cricbuzz).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 26, 2023
ऋतुराज गायकवाडने २०२१च्या जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने या फॉरमॅटमध्ये भारतीय संघासाठी ९ सामने खेळले असून १३५ धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे पृथ्वी शॉची टी -२० क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी काही खास कामगिरी राहिलेली नाही. म्हणजे पृथ्वीला या फॉरमॅटमध्ये खेळण्याची एकदाच संधी मिळालेली आहे. त्यामुळे त्याला आता संधी मिळाल्यास स्वतःला सिद्ध करण्याचे चांगले आव्हान असणार आहे.