मांडवगण फराटा- पुणे जिल्ह्यात भीमा नदीकाठी मृतदेह मिळण्याचे सत्र सुरूच असून आज सकाळच्या सुमारास शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे भीमा नदी काठी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मण बापुराव सूर्यवंशी (रा. पारगाव ता. दौड, जि. पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
आठवडाभरात भीमा नदीकाठी हा आठवा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याच नदीपात्रात सात जणांचे मृतदेह आठवडाभरात मिळून आले होते. पुन्हा एकदा याच ठिकाणी मृतदेह मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत रामचंद्र बापूराव सूर्यवंशी (वय 40 रा. पारगाव ता. दौंड जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामचंद्र सूर्यवंशी यांना ज्ञानदेव ताकवणे यांचा फोन आला कि पारगावचे पुलावर ये तुझा भाऊ लक्ष्मण सूर्यवंशी नदीच्या कडेला पडलेला आहे. तेव्हा रामचंद्र सूर्यवंशी यांनी लगेच नागरगाव (ता. शिरूर जि. पुणे) गावचे हडी पारगाव पुलाजवळ नदीचे कडेला जाऊन पाहिले असता त्यांचा भाऊ लक्ष्मण सूर्यवंशी यांचा मृतदेह पडलेला त्यांना दिसला.
त्यावेळी रामचंद्र सूर्यवंशी यांनी त्याचेजवळ जाऊन पाहिले असता त्याचे नाका तोंडातून फेस येत होता व त्याचे शरीर थंड झाले असल्याने त्यांचा भाऊ लक्ष्मण सूर्यवंशी हा मयत झाल्याची खात्री झाल्याने सूर्यवंशी यांनी याबाबत शिरूर पोलिसांना कळवले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र साबळे हे करत आहे.
यावेळी घटनास्थळी मांडवगण फराटा पोलीसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, सहाय्यक फौजदार राजेंद्र साबळे, संपत खबाले, योगेश गुंड, होमगार्ड राहुल चौगुले, सातपुते टेंगले आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष ज्ञानदेव ताकवणे, जालिंदर भोगाडे, डॉ. राहुल ताकवणे, खंडू ताकवणे, रवींद्र बोत्रे, रामचंद्र बोत्रे, नागेश चंद्राकर, आप्पा कदम, अंकुश शेलार, बापू बोत्रे आदी ग्रामस्थांनी नदीकाठी असलेला मृतदेह बाहेर काढण्याकामी पोलिसांना विशेष सहकार्य केले.