नवी दिल्ली,- अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी रशियावर बरेच निर्बंध घालूनही रशिया- युक्रेन युद्ध चालूच आहे. त्यामुळे रशियावरील दबाव वाढविण्यासाठी अमेरिका आणि जी-7 मधील इतर देश रशियाकडून सोने खरेदी थांबविणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारताला रशियाकडून सोने खरेदी महागात पडू शकते किंवा रशियामधील सोने स्मगलिंगच्या माध्यमातून भारतासह इतर देशात जाऊ शकते.
त्यामुळे भारतीयांना सोने खरेदीची इच्छा काही प्रमाणात कमी करावी लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये सोन्याच्या किमती काही प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोने -चांदी व्यापाऱ्याचे या घटनाक्रमाकडे बारीक लक्ष असून आगामी काळात परिस्थिती कसे वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
प्राप्त माहितीनुसार जी-7 रशियाकडून सोने खरेदी करणार नाही. जी-7 देशांमध्ये अमेरिकेबरोबरच कॅनडा, जपान, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे. जी-7 सदस्य देशांची बैठक सध्या जर्मनीत चालू आहे. रविवारी या बैठकीत रशियाच्या सोन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर यावेळी युद्धामुळे जागतिक अन्न आणि ऊर्जा पुरवठयावर झालेल्या परिणामावर चर्चा करण्यात आली.
तूर्त ब्रिटन, अमेरिका, कॅनडा आणि जपानने रशियाकडील सोने खरेदी बंद करून टाकली आहे. इतर देशही लवकरच हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या घटनाक्रमाचा भारतावर परिणाम होऊ शकतो. याबाबत विश्लेकांनी सांगितले की, भारत जगात सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा सोने खरेदी करणारा देश आहे तर चीन हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे.
चीन आणि रशियाचे नजीकचे संबंध पाहता चीनला रशियाकडून मिळणाऱ्या सोन्यावर फारसा परिणाम होणार नाही. मात्र जागतिक बाजारात रशियाचे सोने अधिक किमतीवर येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये औपचारिक व्यापारातून जर भारताने सोने खरेदी केली तर ती महागात पडण्याची शक्यता आहे. भारतामध्ये सोन्याची स्मगलिंग वाढू शकते.
रशियात दरवर्षी साधारणपणे 350 ते 380 टन एवढे सोने तयार होते. हे सोने इंग्लंड आणि स्वित्झर्लंडमार्गे जगातील इतर देशात जात असते. आता इंग्लंडने जर सोन्यावर बहिष्कार टाकला तर रशियाला व्यापारासाठी पर्यायी मार्ग शोधावे लागतील. अशा परिस्थितीमध्ये या सोन्याचा दर वाढू शकतो.