नवी दिल्ली – सोमवारी जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ नोंदली गेली. त्यामुळे भारतीय सराफातही सोन्याचा दर वाढला आहे. भारतीय सराफात सोन्याचा दर सोमवारी 302 रुपयांनी वाढून 50,822 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
गेल्या आठवड्यामध्ये सोन्याचा दर बराच कमी झाला होता. चांदीचा दर 781 रुपयांनी वाढून 60,231 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,839 डॉलर व चांदीचा दर 21.45 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.
याबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, अगोदरच रशिया- युक्रेन युद्ध आणि अमेरिकेच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळे सोन्या-चांदीचे दर अस्थिर होते. आता रस्त्यावरील दबाव वाढविण्यासाठी अमेरिका आणि इतर मित्रराष्ट्र रशियाच्या सोने आयातीवर बंदी घालणार आहेत.
अशा परिस्थितीमध्ये जागतिक पातळीवर सोन्याचा पुरवठा कमी होऊ शकतो असे बऱ्याच व्यापाऱ्यांना वाटत असल्यामुळे काही व्यापारी सोन्याची खरेदी वाढवीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सोन्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. भारतालाही सोने महागात पडण्याची शक्यता असल्यामुळे भारतातही आगामी काळात सोन्याचे दर वाढू शकतात. मात्र आगामी काळात या संबंधात परिस्थिती कशी वळन घेते यावर बरेच काही अवलंबून आहे.