वॉशिंग्टन – करोनावरील लस तयार करण्यासाठी अनेक देशांमध्ये संशोधन सुरु आहे. ही लस तयार करण्याबाबत ज्या देशांनी आघाडी घेतली आहे त्याची सर्व माहिती मिळविण्यासाठी चीन व रशियाने गुप्तचरांना कामाला लावले असल्याचा धक्कादायक दावा अमेरिकेतील काही संस्थांनी फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशनच्या (एफबीआय) हवाल्याने केला आहे.
करोनाचा धोका अद्याप जगभरात कायम आहे. तसेच त्यावर उपयुक्त ठरेल अशी लस अद्याप विकसित करण्यात आलेली नाही. मात्र, काही देशांमध्ये अशी लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न व संशोधन सुरु आहे. ही माहिती आपल्याला मिळावी यासाठी या दोन देशांकडून हेरगिरी सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अमेरिका, रशिया व चीनमध्ये हे संशोधन आघाडीवर असल्याचे सांगितले जात असतानाच त्याची माहिती मिळविण्यासाठी ही हेरगिरी सुरु झाली आहे. चीनचे गुप्तचर हॅकर्सच्या मदतीने ही माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेतील विविध वैद्यकिय विद्यापीठे, औषध कंपन्या यांची माहिती हॅक करत आहेत.
नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठासह आणखी काही वैद्यकीय संस्थांकडील माहितीही चोरली जात असल्याचा दावा या विद्यापीठाने केला आहे. चीनच्या हॅकर्सने अमेरिकेतील मॉडर्ना इंक कंपनीवर काही दिवसांपूर्वी सायबर हल्ला केला होता व माहितीची चोरी केली होती असाही दावा करण्यात येत आहे.
या बाबत अमेरिकेच्या न्याय विभागाने चिनच्या दोन नागरिकांवर हेरगिरी केल्याचा आरोपही केला होता. तसेच चीनच्या हॅकर्सने मॅसच्यूसेटमधील एका बायोटेक कंपनीच्या नेटवर्कची रेकीही केली होती. चीनच नव्हे तर रशियाच्या गुप्तचर संस्थेनेही अमेरिका, ब्रिटन व कॅनडात या लसीच्या संशोधनाची माहिती मिळविण्यासाठी हेरगिरी केली होती, असा आरोपही त्यावेळी करण्यात आला होता.