इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील स्थिती
निमसाखर-चीनमध्ये हाहाकार माजवलेल्या करोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हादरले आहे. त्यामुले चिकन, मटन, मासे यासह अन्य मांसाहाराबाबत भीतीपोटी खवय्यांना लगाम लागला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मागणीत घट होत चालली आहे. खवय्यांनी या व्हायरसचा धसका घेतल्याने परिसरात 40 ते 50 टक्के मागणीमध्ये घट झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये सध्या करोना व्हायरस बाबत घरोघरी आणि गावागावातील पारांवर चर्चा होताना दिसत आहेत. कोरोना व्हायरस कुठून आला ते कशामुळे झाला, त्याचा कसा प्रसार होतो. इथपर्यंत सखोल चर्चा होत आहेत.
चीनमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे मांस खाल्ले जाते. यातूनच कोरोना सारखा व्हायरस निर्माण झाला असावा. अशा संदर्भात व्हिडिओ सध्या सोशल मिडियामधून फिरत आहेत. त्यामुळे या जीवघेण्या व्हायरसबाबत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात करोनाच्या संशयामुळे इंग्लिश, ब्रॉयलर, गावरान कोंबडी, बोकडाचे मटन एवढेच काही प्रमाणात माशांच्या बाबतीतही संशयाचे मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात वातारण आहे. यामुळे मासळी, चिकन व बोकडांच्या मांस विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या चिकनसाठी इंग्लिश, गावरान व ब्रॉयलर कोंबडीचा वापर होत असतो. मात्र या व्हायरसच्या अफवांमुळे जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त चिकनची बाजारामध्ये विक्री कमी झाल्याची चर्चा आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये खवय्यांसाठी भिगवण परिसरातून मोठ्या प्रमाणावर किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून मासळी खरेदी करुन ग्रामीण भागात विक्रीसाठी मासळी येत असते. या मिसळीचेही दर कमी करुनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. या नीरा नदीमध्ये चविष्ट रोहू, तिलापी, सोन्या, वाब यासह अन्य प्रकारचे मासे या परिसरात मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. याही मासे विक्रीवर काही अंशी परिणाम झाला आहे. सध्या या भागातील ग्राहक नीरा नदीतील मासेमारी करून आणलेली ताजी मासळी ग्राहक सावधपणे घेणेच पसंत करत आहेत.
उजनी धरणामध्ये दिवसेंदिवस पाण्यामध्ये प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. अशा प्रदूषित पाण्यामध्ये मोठे झालेले मासे टाळावेत अशा काही सूचना देखील यापूर्वी मीडियाच्या माध्यमातून या उजनी धरणाच्या संबंधित काम करणाऱ्या तज्ञांकडून गंभीर आजार होण्याचा शक्यतेचा इशारा यापूर्वीच दिला आहे. यामुळे उजनीतील वाढत्या प्रदुषणाच्या पातळीमुळे उजनीची मासळी नको रे बाबा असे म्हणतं आहेत. यात आणखी एक भर म्हणजे करोनाचा संदर्भ जोडला असल्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवू नका असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
अफवांमुळे मागणी घटली-
गेल्या काही दिवसांपासून इंग्लिश व ब्रॉयलर कोंबड्यांच्या चिकनला असलेली मागणी करोना रोगासंदर्भात होत असलेल्या अफवांमुळे घटली आहे. बोकडाच्या मटनाचे प्रमाणदेखील काही अंशी घटल्याचे निर्दशनास येत आहे. चिकनच्या बाबतीत कोंबडीचे खरेदीचे दर कमी होऊनही ग्राहकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही.