अराह : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि भारतीय कम्यनिस्ट पक्षाचा नेता कन्हैया कुमार यांच्या ताफ्यावर शुक्रवारी हल्ला करण्यात आला. बिहारच्या अराह जिल्ह्यात हा हल्ला करण्यात आला. मात्र कन्हैय्या कुमार यातून सुखरूप बचावले.
यावेळी झालेल्या दगडफेकीत कन्हैय्या कुमार यांच्या ताफ्यातील तसेच अन्य काही वाहनांचे नुकसान झाले. त्यांच्या ताफ्यावर अशा स्वरूपाचा हल्ला होण्याचा हा आठवा प्रकार आहे, असा आरोप कन्हैय्या कुमार यांच्या समर्थकांनी केला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते बक्सर येथील बैठक आटोपून अराहकडे जात होते. हा ताफा जात असताना काही समाजकंटकांनी त्यावर दगडफेक केली, असे पोलिसांनी सांगितले.
या हल्ल्यात कन्हैय्या कुमार यांच्या मोटारीचे नुकसान झाले. मात्र पोलिसांनी त्यांना सुखरूप दुसऱ्या वाहनातून अराहकडे रवाना करण्यात आले. कन्हैय्या कुमार सध्या जन गण मन यात्रेवर आहेत. सुधारीत नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरीकत्व सुची विरोधात प्रबोधनाची मोहीम राबवत आहेत.