पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिका पथ विभाग अभियंत्यांच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी टेबल ड्रॉव्हरमध्ये जवळपास दोन ते तीन लाख रुपयांची रक्कम असलेल्या नोटांचे बंडल सापडले. या प्रकारानंतर महापालिकेत मोठा गोंधळ उडालेला असतानाही बुधवारी महापालिका प्रशासनाकडून या प्रकरणाची साधी चौकशीही केलेली नसल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर ही रक्कम, तसेच संबधित अभियंता गायब आहे.
मात्र, त्यानंतरही पथ विभागाकडून जणू काहीच घडले नसल्याच्या आविर्भावात कामकाज सुरू आहे. आयुक्तांनी चौकशी करण्याचे आदेश दिले असले, तरी कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही. त्यामुळे हे प्रकरण मिटविण्यासाठी आता अधिकाऱ्यांचा आटापिटा सुरू असून, या प्रकरणात केवळ हा अभियंताच नसून अनेक अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच चौकशी आणि कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा पालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.
काय आहे रोकड प्रकरण
आम आदमी पक्षाचे काही कार्यकर्ते तक्रारीसाठी पथ विभागात आले होते. आम आदमी पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरातील युवकचे कार्यकर्ते रविराज काळे, तसेच ऋषीकेश कानवटे हे बाणेर येथील एक तक्रार घेऊन पथ विभागाच्या अधीक्षक अभियत्यांकडे आले होते. त्या वेळी या कार्यालयातील एका कनिष्ठ अभियत्यांला एका ठेकेदाराने नोटांचे बंडल असलेले बंद पाकीट दिल्याचे काळे यांनी पाहिले.
या अभियंत्याने हे पाकीट टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवून दिले. हा प्रकार पाहिल्यानंतर काळे व त्यांच्या सहकार्यांनी संबंधित अभियंत्याकडे विचारणा केली, त्यावर या अभियंत्याने एका ठेकेदाराने हे पैसे थोड्या वेळासाठी आपल्याकडे ठेवायला दिले असल्याची उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून महापालिकेत एकच गोंधळ उडाला होता.
साधा खुलासाही नाही
महापालिकेत अनेकदा लाचलुचपत विभागाची कारवाई होते. मात्र, पहिल्यांदाच अशा प्रकारे एखाद्या अभियंत्याच्या टेबलावर रोख रक्कम सापडली आहे. ही रक्कमही मोठी असल्याने या प्रकरणाची पथ विभागाने आणि महापालिका आयुक्तांनीही गंभीर दखल घेणे आवश्यक होते. मार्चअखेर असल्याने अनेक विभागांत बिलांसाठी पैसे मागितले जात असताना हा प्रकार गंभीर आहे.
मात्र, या प्रकाराला चोवीस तास झाले, तरी पथ विभागाने संबंधित अभियंत्यांकडे साधा खुलासाही मागितलेला नाही. तसेच संबधित अभियंता कामावर आला आहे की रजेवर, याची माहितीही पालिका प्रशासनाकडे नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन याप्रकरणी कारवाईस टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.
याप्रकरणी माहिती घेतली जात आहे. मात्र, कोणतीही नोटीस अथवा कारवाईची प्रक्रिया केलेली नाही. अतिरिक्त आयुक्त, तसेच महापालिका आयुक्तांच्या चर्चेनुसार पुढील कारवाई केली जाईल. – अनिरुद्ध पावसकर (पथ विभागप्रमुख)