यवतमाळ – जिल्ह्यात राजकीय, प्रशासकीय यंत्रणेच्या पाठबळामुळे रेती माफियांचा हैदोस वाढल्याचे दिसत आहे. यामुळेच एका माहिती अधिकार कार्यकर्त्याचे (आरटीआय) सिनेस्टाईल अपहरण करून त्याला ओलीस ठेवत मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एवढेच नाही तर समाजात आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये दहशत पसरावी म्हणून या कार्यकर्त्यास विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर देखील व्हायरल करण्यात आला आहे. गुरूवारी रात्री संबंधित कार्यकर्त्याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघांना अटक करण्यात आली.
याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद शगीर मोहम्मद अन्सारी (45), रा.पॉवरहाऊस, पांढरकवडा रोड, समीर राजा (26), शगीरचा भाऊ सलीम अन्सारी (39). सचिन महल्ले (43), अतुल शामराव कुमटकर (38), रा. तलावफैल, छोटू भांदक्कर (40), रा. टिळकवाडी, शाज अहेमद नजीर अहेमद (36), अजय श्रीराम गोलाईत (39), कादर याचा भाऊ मन्सूर अशा नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील मोहम्मद शगीर मोहम्मद अन्सारी, शाज अहेमद नजीर अहेमद आणि अजय गोलाईत या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांनी दिली.