मंचर – घोडेगांव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेला आर.टी.आय कार्यकर्ता (माहिती अधिकार कार्यकर्ता) गणेश बाळासाहेब बारवे (रा. चास) याला पोलिसांनी 5 मिनिटे थांबण्यास सांगितले. याचा राग अनावर होवुन चिडुन जावुन पोलिस ठाण्याच्या संरक्षक भिंतीवर डोके आपटले, तसेच हाताची नस कापण्यासाठी वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घोडेगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडेगांव पोलिस ठाणे येथे सोमवार दि.8 रोजी पोलीस ठाण्याच्या पुढील गेटच्या बाजुस गणेश बाळासाहेब बारवे (रा.चास ता.आंबेगाव) हे पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज घेवुन आले. त्यावेळी ठाणे अंमलदार पोलिस जवान अनिल बकरे यांनी तुम्ही 5 मिनिट थांबा असे म्हणाल्याच्या कारणावरुन चिडुन जावुन गणेश बारवे यांनी पोलिसांशी अरेरावी करुन मोठमोठ्याने आरडा-ओरडा करुन सार्वजनिक शांततेचा भंग केला.
तु मला ओळखत नाही का? मी आर.टी.आय. कार्यकर्ता आहे. मी तुझी वरिष्ठांकडे तक्रार करुन तुला कामाला लावीन. अशी धमकी गणेश बारवे यांनी देवून संरक्षक भिंतीवर स्वतःचे डोके आपटुन स्वतःच्या गालावर हाताने चापटा मारुन तसेच लोखंडी स्केल फुटपट्टीने स्वतःच्या डाव्या हाताच्या पोटरीवर हाताची नस कापुन घेण्यासाठी वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी गणेश बारवे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक लहु शिंगाडे करत आहे.