पुणे – शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राखीव जागांच्या ऑनलाइन प्रवेशासाठी प्रतिक्षा यादीतील मुलांना 28 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आरटीईचे आतापर्यंत राज्यभरातून 81 हजार प्रवेश निश्चित झाले आहेत. परंतु, रिक्त जागांची संख्या जास्त असल्याने प्रतिक्षा यादीतील मुलांना प्रवेशासाठी पुन्हा संधी दिली आहे.
राज्यभरातून 81 हजार 848 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. नियमित फेरीतून 68 हजार 233 आणि प्रतिक्षा यादीतून 13 हजार 615 प्रवेश झाले. प्रतिक्षा यादीतील मुलांच्या प्रवेशाची मुदत सोमवारी संपली.
परंतु, प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचलनालयाकडून घेण्यात आला. आतापर्यंत चारवेळा मुदत वाढवली आहे.
जागा रिक्त राहू नयेत आणि विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थी 28 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेऊ शकतात.