शिरूर – अयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारणीसाठी शिरूर शहरातील (घोडनदी) रहिवासी व दानशूर उद्योगपती प्रकाश धारीवाल व आदित्य धारीवाल कुटुंबीयांनी 1 कोटी 51 लाख रुपयांचा निधी दिला आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त व खजिनदार आचार्य स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याकडे निधीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला आहे. यावेळी उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या पत्नी दिनाभाभी धारीवाल, आदित्य धारीवाल, भगिनी उज्वला लुंकड, सुरेखा चोपडा, उद्योगपती हिरालाल मालू, ऍड. एस. के. जैन, सतीश चोपडा आदी उपस्थित होते.
राम जन्मभूमी अयोध्या येथे सुरू असलेले श्रीराम मंदिर उभारणीत एक वीट उद्योगपती प्रकाश धारीवाल व धारीवाल कुटुंब यांच्या नावाने लागणार असून, यामुळे शिरूर शहराच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला असल्याचे बोलले जात आहे.
संपूर्ण देशामध्ये मंदिर उभारणीसाठी किंवा मंदिरासाठी कोणी देणगीसाठी धारिवाल कुटुंबाकडे आले तर त्याला कधी रिकाम्या हाताने धारीवाल कुटुंबीयांचा कोणता सदस्य जाऊ देत नाही. शिरूर शहरातील सर्व धर्म समभाव परंपरा टिकवण्यासाठी धारीवाल कुटुंबाचे सर्वात मोठे योगदान आहे. माणिकचंद धारीवाल यांनी सुरू केली दातृत्वाची ही परंपरा त्यांचे पुत्र रसिकलाल धारीवाल व त्यांच्यानंतर नातू प्रकाशभाऊ धारिवाल आणि आदित्य धारीवाल यांनी अव्याहतपणे सुरू ठेवली आहे.