किल्ले शिवनेरीवर शिवसृष्टी व रोप वे उभारा

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची लोकसभेत मागणी

नारायणगाव – जुन्नर तालुक्‍यातील शिवजन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवसृष्टीची निर्मिती व्हावी व शिव जन्मभूमीवर जाण्यासाठी रोप वेची निर्मिती करून द्यावी, अशी मागणी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (दि. 10) लोकसभेमध्ये केली आहे.

लोकसभा 2019च्या प्रचारामध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भक्ती-शक्ती कॉरिडॉर अंतर्गत किल्ले शिवनेरीवर शिवसृष्टीची निर्मिती करण्याचे आश्‍वासन दिले होते. याच आश्‍वासनाची मागणी आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत शून्य प्रहारामध्ये केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेले जुन्नर तालुक्‍यातील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शिवसृष्टीची निर्मिती झाली तर विश्‍वातील संपूर्ण शिवभक्तांसाठी हे एक प्रेरणास्थळ असेल.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगासाठी प्रेरणादायी आहे, शिवसृष्टीच्या निर्मितीमुळे जगाला शिवरायांचा जीवनपट अनुभवता येईल सोबतच रोजगार निर्मिती होईल आणि पर्यटनास चालना मिळेल. किल्ले शिवनेरीवर जाण्यासाठी किल्ले ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी यांना शिवजन्मभूमीवर जाण्यासाठी रोप वेची निर्मिती करून द्यावी, अशी सुद्धा आग्रही मागणी संसदेत केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.