पिंपरी, (प्रतिनिधी) – थेरगाव येथील रोहित बाळासाहेब कोतकर यांची एमपीएससी मधून सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी (जीएसटी विभाग वर्ग -1) पदी निवड झाली आहे. वडील अन्नसुरक्षा अधिकारी पदी कार्यरत असल्याने लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेकडे करियर म्हणून कोतकर आकर्षित झाले होते.
प्रशासकीय सेवेचे बाळकडू घरापासूनच अनुभवत असल्याने आपणही प्रशासकीय अधिकारी म्हणून आपला ठसा उमटवावा, अशी जिद्द त्यांनी बाळगली होती. त्यानुसार अविरत कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर रोहित बाळासाहेब कोतकर यांची निवड झाली.
रोहित यांनी शालेय शिक्षण वाकड येथील खासगी शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.
हिंजवडी येथील बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये त्यांचे प्लेसमेंट झाले. आयटी कंपनीमध्ये नोकरी करत होते. परदेशातील उच्च शिक्षणाची संधी असताना देखील मूळ प्रशासकीय सेवेची त्यांची आवड होती. त्यामुळे रोहित कोतकर यांनी खासगी नोकरीचा राजीनामा दिला. एमपीएससीच्या परीक्षेच्या अभ्यासाला सुरूवात केली.
कोतकर यांनी यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षा दिल्या. मात्र सुरूवातीच्या काळात थोड्या गुणांनी यश हुलकावणी देत होते. अपयशाने ते खचले नाहीत. जिद्द मेहनत, संयम, चिकाटी ठेवल्याने त्यांना यश प्राप्त झाले. त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, शहरातील नागरिकांनी सन्मान केला.