कराड – कराडमधील बारा डबरी परिसरात शिंदे मळा येथील डॉ. राजेश शिंदे यांच्या बंगल्यात सशस्त्र दरोडा टाकल्यानंतर, दरोडेखोरांनी 46 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज घेऊन मारुती इको कारमधून पलायन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पाटण रस्त्यापर्यंतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दरोडेखोरांची कार कैद झाली असून, त्यांच्या शोधासाठी अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके पुणे, मुंबई आणि परराज्यात रवाना झाली आहेत.
डॉ. राजेश शिंदे हे पत्नी पूजा, इतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या मदतीने शिंदे मळा येथे “होलिस्टिक हिलिंग’ सेंटर चालवतात. या सेंटरच्या बाजूलाच डॉ. शिंदे यांचा बंगला आहेत. या बंगल्यात सोमवारी (दि. 10) पहाटे 3 च्या सुमारास दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून, 27 लाख रुपयांची रोकड आणि 48 तोळे सोन्याचे दागिने, असा अंदाजे 46 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पहाटेच शहर परिसरात नाकाबंदी केली होती; परंतु, पोलिसांना हुलकावणी देऊन दरोडेखोर पसार झाले.
अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या गुन्ह्यात दरोडेखोरांनी मारुती इको कारचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरोडेखोर कारमधून शिंदे मळ्यातून विजय दिवस चौक, दत्त चौकमार्गे जुन्या कोयना पुलावरून पुणे-बंगळुरू महामार्गावरील वारुंजी फाटा येथे, तेथून पुढे पाटण रस्त्याला गेल्याची माहिती पोलिसांनी विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर मिळाली.
ीा इको कार पुढे कुठे गेलीण याची माहिती पोलिसांनी घेतली असता, ही कार पाटणपर्यंतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये दिसली. त्यावरून दरोडेखोर हे पाटण, कोयनानगरमार्गे कोकणात किंवा इतरत्र गेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिसांची पाच पथके पुणे, मुंबई आणि परराज्यात रवाना झाली आहेत. कराड शहर, कराड तालुका, पाटण आणि विविध ठिकाणचे पोलीस अधिकारी व कर्मचारी या दरोड्याच्या तपासात सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही दरोडेखोरांच्या शोधासाठी रवाना झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी तपास करत आहेत.