आलिया भट्टचा आगामी “सडक-2′ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे मुकेश भट्ट यांनी जाहीर केले आहे. यात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि पूजा भट्ट आदी स्टार कलाकार असून तो 10 जुलैला प्रदर्शित होणार होता; परंतु लॉकडाऊनमुळे सद्यपरिस्थितीत ते शक्य नाही.
देशात सुरू असलेल्या करोनाचा संसर्ग पाहता चित्रपटगृहे सुरू होण्याची शक्यता खूपच कमी आहे. मुकेश भट्ट यांनी एका मुलाखतीत सांगितले की, देशातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आपल्याला वाटत नाही की चित्रपटगृहे खुले होतील आणि जर खुले केले तरीही “सडक-2′ चित्रपट पाहण्यासाठी कितीजण येतील हा प्रश्नच आहे.
मुकेश भट्ट म्हणाले, मी हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी मजबूर आहे. कारण पुढील काही दिवसांत सद्यपरिस्थितीत बदल होण्याची किंचितही शक्यता दिसत नाही. आपल्याला काही कामे ही मजबुरीतही करावे लागतात, जे आपण करू इच्छित नाही. आमच्याकडे दुसरा कोणताही विकल्प नाही.
दरम्यान, “सडक-2′ हा 1991मध्ये प्रदर्शित झालेल्या पूजा भट्ट आणि संजय दत्त यांच्या “सडक’चा सिक्वल आहे. अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांचा “गुलाबो सिताबो’ हा चित्रपटही नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. तसेच सुशांतसिंह राजपूत याचा अखेरचा “दिल बेचारा’ चित्रपटही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.