मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूतप्रकरणी अखेर एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला आज अटक करण्यात आली आहे. सलग तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून आज रियाची चौकशी सुरू होती. त्यानंतर एनसीबीने रियावर अटकेची कारवाई केली आहे. तिला न्यायालयात हजर केले असता चौदा दिवसांची कोठडी सुनावली आहे.
एनसीबी आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून पुन्हा रियाची चौकशी करत होती. काल आणि परवा तब्बल 10 तास रियाची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आजच्या पाच तासांच्या चौकशीनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला अटक केली. सध्या एनसीबी कार्यालयाच्या बाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कुठल्याही आरोपीला अटक केल्यानंतर त्याची कोविड चाचणी केली जाते. अटकेपूर्वीची ही सर्व प्रक्रिया असते. त्यासाठी रियाला सायन रुग्णालयात नेण्यात येणार आहे.
एनसीबीच्या कार्यालयातील महिलांच्या कोठडीची साफसफाई झाल्याने रियाच्या अटकेचे स्पष्ट संकेत मिळू लागले होते. रिया आणि शोविकच्या व्हॉट्सऍप चॅटमध्ये बड्स आणि डब्ज या ड्रग्ज तस्करीत वापरल्या जाणाऱ्या सांकेतिक शब्दांचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच एनसीबीने यांच्याभोवतीचा फास आवळला आहे.
या कारवाईनंतर नाराजी व्यक्त करत रियाचे वकील सतीश माने-शिंदे म्हणाले, न्यायाची थट्टा चालवली आहे. तीन केंद्रीय तपास यंत्रणा मिळून एका महिलेची पिळवणूक करत आहेत, कारण ती अंमलीपदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या प्रेमात होती. ज्याला अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्याच्या समस्येने ग्रासले होते. जो मुंबईतील पाच अग्रगण्य मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली होता. ज्याने बेकायदेशीर औषधी आणि ड्रग्जचं सेवनातून आत्महत्या केली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला चार दिवसांपूर्वीच एनसीबीने अटक केली आहे. त्याच्यासोबत सॅम्युअल मिरांडालाही अटक झाली. या सर्वांची चौकशी सुरू आहे. गेल्या आठ दिवसांत एनसीबीने केलेली ही दहावी अटक आहे. त्यापैकी तिघा जणांना जामीन मंजूर झाला आहे.