मुंबई – महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा मोठ्या थाटात जल्लोष साजरा केला जात आहे. मंगळवारी घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. अनेक बॉलीवूडमधील कलाकारांच्या घरी मोठ्या उत्साहात बाप्पाचे स्वागत झाले आहे. अभिनेता रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) यंदाही इको फ्रेंन्डली बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली आहे. रितेश आणि त्याच्या मुलांनी स्क्रॅप वस्तूंना एकत्रित जोडून सुंदर गणपती तयार केली आहे.
रितेशने एक व्हिडिओ शेअर करत त्याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मुलांसोबत नेहमीच काही तरी खास करण्याचा रितेश आणि जिनिलियाचा प्रयत्न असतो. यंदा त्यांनी लोखंडांच्या पार्ट्स पासून रिसायकल मूर्ती साकारली आहे. रितेशनं त्याच्या लेकांचा शेअर केलेला व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
ही पोस्ट शेअर करत रितेशने लिहिले की, ”दरवर्षी आपल्या घरी गणपती येतो, तेव्हा आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. यापूर्वी आम्ही मातीचा गणपती बनवला, पेपर म्हणजे कागदाचाही गणपती बनवला. मात्र, यंदाचा इको फ्रेंडली गणपती बनवताना वेगळीच संकल्पना होती. अर्थात ही कल्पना माझ्या मुलांची होती.”
View this post on Instagram
रितेशचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्याच्या मुलांचे कौतुक केले आहे. ‘महाराष्ट्राची संस्कृती जपताय साहेब आपण’, असे म्हणत अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओत शेवटी गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती दिसून येत आहे. या मूर्तीसोबत देशमुख परिवार आरती करतानाही पाहायला मिळत आहे. मात्र रितेशच्या या आगळ्यावेगळ्या बाप्पांचे साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.