अमरावती, दि. 26 – दीपाली चव्हाण नावाच्या एका महिला वन अधिकाऱ्याने केलेल्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील उप वन संरक्षक विनोद शिवकुमार याला अटक केली आहे. त्याला आज सकाळी नागपुर रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले.
दीपालीच्या आत्महत्या प्रकरणाला तोच जबाबदार असल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी दिली होती. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. दीपालीने अमरावती जिल्ह्यातील हरिसाल गावात आपल्या राहत्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्हमत्या केली होती.
दीपालीच्या आत्महत्या प्रकरणात व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एन श्रीनिवास रेड्डी यांच्याही अटकेची मागणी तिच्या कुटुंबियांनी व तिच्या पाठीराख्यांनी केली असून या प्रकरणात त्यांनी जोरदार निदर्शनेही केली होती.
या दोन्ही आरोपींनी तिची सतत अवहेलना केल्यामुळेच वैतागून दीपालीने आत्महत्या केली असल्याचा तिच्या कुटुंबियांचा आरोप आहे. स्वत: दीपाली हीनेही मृत्यूपुर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात तिने विनोद शिवकुमार आणि संचालक श्रीनिवास यांनी आपल्याला त्रास दिल्याचे म्हटले होते.