पूर्व हवेलीतील अनेक गावे सीलबंद : अधिकाऱ्यांना दक्षतेचे आदेश
थेऊर- हवेली तालुक्यामध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पूर्व भागातील बहुतांशी गावे पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात आली आहेत. याकामी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना योग्य त्या आवश्यक सूचना दिल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिंडन्ट कमांडर सचिन बारवकर यांनी दिली.
हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, शेवाळवाडी, कुंजीरवाडी, नायगाव, सोरतापवाडी, कोंढवे धावडे, न्यू कोपरे या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कार्यक्षेत्र व सर्व वाड्या- वस्त्या परिसर शुक्रवार (दि.24) मध्यरात्रीच्या दरम्यान सील केला आहेत. याअगोदरच उरुळी कांचन, मांजरी, आव्हाळवाडी, वाघोली, केसनंद, लोणीकंद, भावडी या गावातील भाग सीलबंद केलेला आहे. काही गावांना केंद्रबिंदू मानून बफर झोन जाहीर केलेले आहेत. त्यामुळे येथील अत्यावश्यक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली असली तरी प्रामुख्याने करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
पूर्व हवेलीतील बहुतांशी गावांमध्ये करोना रुग्ण आढळून आले आहे. या गावांतील लोकसंख्या जास्त असल्याने भागातील प्रशासन चांगलेच अलर्ट झाले आहे. ग्रामसेवक, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी, आरोग्य विभाग सतर्कतेने कार्यरत आहे. पूर्व हवेलीतील परिस्थितीचा सातत्याने ते आढावा घेत आहेत.
उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामधील निर्बंधातून कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार व तेथील मालाची आवक- जावक यांना वगळण्यात येत आहे.परिसरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना यामधून वगळण्यात येत आहे. या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीतच दूध, भाजीपाला, फळे व मटण, चिकन यांची किरकोळ विक्री सुरू राहील. या विक्रीसंबंधित ग्रामपंचायतींनी निश्चित केलेल्या जागेवर होईल. असे स्पष्ट आदेश गावांकरिता दिलेले आहेत.
- पुढील काळात हवेलीतील वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता इतरही गावे सील करण्यात येतील. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. सर्वांनी नियमित मास्क वापरावे, प्रशासनाला सहकार्य करावे. आरोग्य विभागास तपासणीसाठी सहकार्य करावे. बाहेरील व्यक्तींना आपल्या गावांत येण्यासाठी प्रतिबंध करावा. वेळीच याकामी प्रशासनाला माहिती द्यावी.
– सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी तथा इन्सिंडन्ट कमांडर. हवेली.