पुणे : शहरात मागील दोन दिवसापासून दिवसाला 100 हुन अधिक रुग्ण वाढत असले तरी रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 5 दिवसावरून 8 दिवसावर गेला आहे. शहरातील रुग्ण संख्येचे पुणे स्मार्ट सिटीकडून विश्लेषण करण्यात आले असून या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. मार्च महिन्यात पाहिला रुग्ण सापडल्यानंतर हा आकडा 7 दिवसात दुप्पट झाला होता नंतर तो तीन वेळा पाच दिवसावर आला तर त्यानंतर सहा दिवस आणि चालू आठवड्यात तो 8 दिवसावर आला आहे. त्यामुळे शहरासाठी काही अंशी ही दिलासादायक बातमी आहे.
शहरात 9 मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर 20 मार्च रोजी शहरातील रुग्णांचा आकडा 212 वर गेला होता. त्यानंतर 12 चे 28 रुग्ण 28 मार्च रोजी झाले. या दुप्पट वाढीसाठी 7 दिवसाचा कालावधी लागला होता. त्यानंतर मात्र, 29 मार्च ते 1 एप्रिल या पाच दिवसात रुग्ण संख्या 54 वर गेली.
तर 54 चे 125 रुग्ण संख्या 1 ते 6 एप्रिल या कालावधीत झाली ( पाच दिवसात) पुढे 125 चे 236 रुग्ण 10 एप्रिल पर्यंत झाले ( पाच दिवसात दुप्पट) पुढे 236 चे 478 रुग्ण पुढील सहा दिवसात म्हणजे 16 एप्रिल पर्यंत झाले तर 404 चे 831 रुग्ण हे 23 एप्रिल पर्यंत झाले आहेत. म्हणजेच गेल्या आठवड्यात रुग्ण संख्या वेगाने वाढत असली तरी दुपट्ट होण्यास आठ दिवसाचा कालावधी लागला असल्याचे स्मार्ट सिटीच्या विश्लेषणातून समोर आले आहे.
शहरात साथीचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्यातच आता उपचार तसेच टेस्टिंग संख्या वाढविली आहे त्यामुळे रुग्ण वाढत आहेत. सुरुवातीला 5 दिवसात संख्या दुपट्ट होत होती आता आठ दिवसावर हा आकडा गेला आहे. केंद्रशासनाच्या पथकाने सुद्धा याची दखल घेतली आहे. आता हा कालावधी 10 ते 12 दिवसावर नेण्याचा प्रयत्न असून केंद्राने या बाबत समाधान व्यक्त केले आहे. – रुबल अग्रवाल ( अतिरिक्त आयुक्त , महापालिका)