पिंपरी – लोकप्रतिनिधी शिवाय नागरिकांना समस्या मांडता याव्यात व त्याचे निराकरण व्हावे, यासाठी नऊ वर्षांपूर्वी सारथी हेल्पलाइन सुरू केली. त्यानंतर विविध माध्यमातून सारथीचा विस्तार करण्यात आला. देशातील 219 शहरांमध्ये सारथी उपक्रम राबविण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले. त्यामुळे पिंपरी चिंचवडची सारथी ही देशाची सारथी झाली. गेल्या नऊ वर्षांत तब्बल 19 लाख 78 हजार 671 जणांनी सारथीवर संपर्क करीत तक्रारी केल्या तसेच विविध उपक्रमांची माहिती घेतली. नुकतीच सारथीला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत.
महापालिकेच्या विषयाची संबंधित कोणतीही तक्रार करायची असल्यास नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयात यावे लागत असे किंवा नगरसेवकांच्या मार्फतीने तक्रार करता येत असे. मात्र अनेकदा नागरिकांनी केलेल्या तक्रारी सोडवायच्या किंवा नाही हे लोकप्रतिनिधींच्या हातात असे. नागरिकांना थेट फोनवरून तक्रार करता यावी, यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी 8888006666 या क्रमांकावरून 15 ऑगस्ट 2013 रोजी सारथी हेल्पलाइनला सुरुवात केली.
आलेल्या तक्रारीचे स्वरूप पाहून ती तक्रार किती दिवसांत सोडवायची याबाबत निश्चित कालावधी आखून देण्यात आला. मात्र तक्रारी सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्यास त्या विभागाचे पॉइन्टद्वारे मूल्यमापन करण्यास सुरुवात केली. यामुळे आपल्या विभागाला जादा पॉइन्ट मिळू नये यासाठी विभागप्रमुख तक्रारी सोडविण्याकडे लक्ष देऊ लागले आणि नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक होऊ लागली. हेल्पलाइन नंतर सारथीचा विविध मार्गाने विस्तार करण्यात आला.
तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी गौरव केल्यामुळे सारथीची चर्चा देशपातळीवर होऊ लागली. विविध राज्यांतून विविध शासकीय व महापालिकेचे अधिकारी सारथीला भेट देऊ लागले. एवढेच नव्हे तर जगातील शहरांचा अभ्यास करणारे विद्यार्थीही आजही सारथीला भेट देतात. सारथील हेल्पलाइनच्या 8888006666 या क्रमांकावर 5 जुलै 2022 पासून व्हॉटस्ऍपवर चॅटबॉट सुरू केले असून त्याद्वारे दररोज 80 हून अधिक तक्रारी प्राप्त होत आहेत.
15 ऑगस्ट 2013 रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेत सारथी हेल्पलाइनला सुरुवात
-26 सप्टेंबर 2013 रोजी शरद पवारांकडून सारथी हेल्पलाइनचे कौतुक
-27 ऑगस्ट 2016 रोजी देशातील 219 शहरात सारथी
-सुरू करण्याचे केंद्राचे आदेश
-राज्यातील विविध महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी 2016 मध्ये सारथीकडून सेमिनारचे आयोजन
-जगातील शहरांचा अभ्यास करणाऱ्या जर्मनी, युके,
-यूएसच्या विद्यार्थ्यांकडून सारथीला भेट