पुणे- मागील तीन आठवड्यांत जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. एकूण चाचण्यांपैकी सुमारे 25 टक्क्यांपेक्षा अधिक अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण आहे. ते कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून, नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यात करोना चाचण्या वाढवण्यात आल्या असून, गेल्या चार आठवड्यांत 3 लाख 25 हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील सुमारे 80 हजार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. ग्रामीण भागात 65 ते 70 ग्रामपंचायतीमध्ये करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे ज्या गावांत संसर्ग नाही, त्याठिकाणी खबरदारी घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
करोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. त्यामध्ये पुणे शहरात एका रुग्णामागे 11, पिंपरीत 10 तर ग्रामीणमध्ये 13 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली जात असून, आवश्यकता असल्यास चाचणी केली जात आहे, अशी माहिती राव यांनी दिली.
प्लाझ्मा दानाचा अर्ज भरून घेणार
करोना रुग्णांना सरकारी, खासगी रुग्णालये किंवा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करुन घेतल्यानंतर संबंधितांकडून प्लाझ्मा दान करण्याबाबतचा अर्ज भरून घेण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात प्लाझ्मा उपलब्ध होण्याच्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे. याविषयी विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, “शहरात 20 ब्लड बॅंक आहेत. या ब्लड बॅंकांकडून आतापर्यंत 1 हजार 600 पिशव्या प्लाझ्मा गोळा करण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 350 प्लाझ्मा देण्यात आले आहे. सध्या 250 प्लाझ्मा शिल्लक आहे. मात्र, हा साठा कमी असून रक्तद्रव दान वाढण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. त्याकरिता प्लाझ्मा दानाचा अर्ज भरुन घेण्यात येत आहे.’