प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 6 – लोहगाव परिसरातील खंडोबा माळ, पठारे वस्ती व इतर अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोठे खड्डे पडले आहेत, रस्त्यावरून जाताना वाहन चालक, पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. लोहगाव परिसरातील रस्त्यांची दुरस्तीसह रुंदीकरण, नवे रस्ते याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका प्रशासनास केली आहे.
लोहगाव परिसरातील विविध रस्त्यांच्या कामांची पाहणी, रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच पोरवाल रोड येथील रस्त्याच्या भूसंपादनाच्या कामाची पाहणी आमदार सुनील टिंगरे यांनी शुक्रवारी (दि.5) केली. यावेळी महापालिकेचे पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी टिंगरे यांनी स्वत: अधिकाऱ्यांसोबत जाऊन दुरवस्था झालेल्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. तर, यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनीही रस्त्यांच्या तसेच पाण्याच्या समस्या थेट अधिकाऱ्यांच्या समोराच मांडल्या. पोरवाल परिसरातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक समस्या दूर करण्यासाठी पर्यायी रस्ता विकसित करण्यात येत आहेत. या रस्त्यांसाठी 200 मीटरचे भूसंपादन बाकी आहे, ते लवकर पूर्ण करावे, ऑर्चिड हॉस्पिटल शेजारील आर.पी. रोड शुरू करावा तसेच पोरवाल रस्त्याला सर्व पर्यायी माग तातडीने पूर्ण करावेत, अशा सूचनाही टिंगरे यांनी प्रशासनास केल्या आहेत.
पाणी प्रश्नीही सूचना…
महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतरही लोहगावातील पाणी समस्या दूर झालेली नाही. गावातील जुन्या पाइपलाइन काढून त्याजागी नवीन पाणी वितरणाचे जाळे पसरविणे आवश्यक आहे. या कामाकरिता 60 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हे काम लवकर सुरू करण्याची सूचना प्रशासनास करण्यात आल्याचेही आमदार टिंगरे यांनी सांगितले. साठे वस्ती तसेच पोरवाल रोड परिसरातील नागरिकांना देखील पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. याकरिता 8 इंचाची नवीन पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ग्रॅविटीने पाइपलाइनमधून पाणी घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या परिसरासाठी पाइपलाइनला बूस्टर लावण्याचे काम 15 दिवसांत केले जाणार असून हे काम लवकरात लवकर करण्याची सूचना केली असल्याचेही टिंगेरे यांनी सांगितले.