पुणे – प्रख्यात सिध्दांतिक भौतिक शास्त्रज्ञ थानू पद्मनाभन यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्टॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स येथे प्राध्यापक असणाऱ्या पद्मनाभन यांचे 300 हून अधिक शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. याशिवाय त्यांनी या विषयावरील अनेक पुस्तकांचे लेखनही केले आहे. गुरूत्वाकर्षण, गुरूत्व मध्य (जडत्व) आणि विश्विाची निर्मिती आणि संरचना या क्षेत्रात त्यांचा नावलौकीक मोठा होता.
प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञांमध्ये जगातील नामवंत शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश स्टॅंडफोर्ड विद्यापीठाने केला होता. त्यात त्यांचा क्रमांक 24 वा होता.
प्रा. पद्मनाभन यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला धक्का बसला. जनरल रिलेटिव्हिटी आणि थर्मोडायनेमिक क्षेत्रातील त्यांच्या संशोधनाला व्यापक मान्यता मिळाली होती. ते बुध्दीवंत, संवादक आणि अनेकांचे मित्र होते. त्याचा विरह दीर्घ काळ जाणवेल, असे ट्विट केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी केले आहे.
आपले पदव्युत्तर शिक्षण केरळमध्ये पूर्ण केल्यानंतर पद्मनाभन यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथून 1979 ते 83 या काळात पी. एचडी. मिळवली. त्यानंतर पोस्टडॉक्टरल पदवी त्यांनी केंब्रीज विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ ऍस्ट्रॉनॉमी येथून मिळवली. पद्मनाभन यांना पद्मश्री आणि इन्फोसिसच्या पहिल्या गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.