कात्रज -कात्रज कचरा प्रक्रिया प्रकल्पावरील घंटागाड्यांमधील डीझेल चोरी होत असल्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत तेथील कर्मचारी व अधिकारी संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप होत आहे. या काळ्या कारभारात लाखो रुपयांचे इंधन परस्पर विकले जात आहे. दरम्यान, येथील सुरक्षा कॅमेरे तीन वर्षांपूर्वीच नादुरुस्त म्हणून काढून टाकण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर येथे सीसीटीव्ही नसल्याने डीझेल चोरी होत असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे.
धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाशेजारीच हा कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे. येथील रॅम्पवर दररोज येथे घंटागाड्या उभ्या केल्या जातात. यामध्ये अनेक गाड्यांमध्ये पालिकेच्या खर्चांमधून डीझेल भरले जाते. मात्र, या वाहनांतून दरररोज रात्री डीझेल चोरी होत आहे. यासाठी अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे का, असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकल्पशेजारील आरोग्य कोठीवर काही दिवसांपूर्वी काही व्यक्ती खासगी वाहनांत डीझेल टाकताना आढळल्या. हटकल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत पळ काढला. याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्नही संघटनेने केला. याबाबत संघटनेचे युवा कार्याध्यक्ष संतोष साठे यांनी सहायक आयुक्तांना लेखी निवेदन दिले असून, या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत, भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
डीझेल चोरीबाबत वारंवार तक्रारी करूनही धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाकडून दखल घेण्यात येत नाही. येथील सीसीटीव्ही तीन वर्षांपासून काढून टाकण्यात आलेले आहेत. त्यामुळे शंकेला वाव आहे. डीझेल चोरण्यासाठी येथील सीसीटीव्ही काढण्यात आले आहेत.
– संतोष साठे, युवा कार्याध्यक्ष, प्रहार, पुणे