T20 World Cup 2024 : आयसीसीच्या ‘या’ नियमामुळे बांगलादेशचा झाला पराभव, ‘हा’ नियम इतर संघांसाठीही ठरू शकतो घातक…

T20 World Cup 2024 (SA vs BAN) : टी-20 विश्वचषक 2024 च्या 21 व्या सामन्यात, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) एक नियम बांगलादेशसाठी घातक ठरला. आयसीसीच्या या नियमामुळे बांगलादेशला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमवावा लागला. हा नियम स्पर्धेतील इतर संघांसाठीही घातक ठरू शकतो. या नियमानुसार अंपायरने बांगलादेश संघाला चौकार दिला नाही. मग..कोणता आहे तो नियम, ज्यामुळे बांगलादेशचा पराभव झाला? चला समजून घेऊया.
बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना 04 धावांनी गमावला आणि पंचांनी बांगलादेशला सामन्यात एक चौकार दिला नाही, जो सामन्यात विजयी धावा ठरू शकला असता. हा चौकार बांगलादेशला स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवून देऊ शकला असता, पण तसे होऊ शकले नाही.
काय आहे नियम…
खरेतर, दुसऱ्या डावात बांगलादेश लक्ष्याचा पाठलाग करत असताना 17व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर संघाला लेग बायच्या चार धावा दिल्या गेल्या नाहीत. असेच काहीसे घडले की, आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ओटनीएल बार्टमॅनने बांगलादेशच्या फलंदाज महमुदुल्लाकडे चेंडू फेकला, जो त्याच्या पॅडला लागला आणि पाठीमागे थेट सीमारेषा पार गेला. कायदेशीरदृष्ट्या त्याला लेग बाय फोर द्यायला हवा होता. पण, चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचण्यापूर्वी आफ्रिकेकडून एलबीडब्ल्यूचे अपील करण्यात आले. आफ्रिकेच्या अपिलवर मैदानी पंचांनी महमुदुल्लाला आऊट दिले. मात्र महमुदुल्लाहने लगेच रिव्ह्यू घेतला आणि त्यानंतर थर्ड अंपायरने त्याला नॉट आऊट दिले. त्यानुसार तुमच्या मनात आले असेल की, नाॅटआऊट राहिल्यानंतर बांगलादेशला लेग बायचा चौकार मिळायला हवा होता. मात्र आयसीसीच्या नियमांमुळे तसे झाले नाही. नियमानुसार अंपायरने आऊटसाठी बोट वर केले तर चेंडूवर गेलेला चौकार किंवा घेतलेली कोणतीही धाव मोजली जात नाही. अंपायरने आऊट दिल्यानंतर चेंडू हा डेड समजला जातो.
17 व्या षटकातील (16.2) दुसऱ्या चेंडूवर काय घडले..
ओटेनिल बार्टमनने टाकलेला दुसरा चेंडू महमदुल्लाने खेळून काढला. लेगस्टंपच्या दिशेने पडलेला हा चेंडू वेगाने सीमारेषेपल्याड गेला. महमदुल्लाने अक्रॉस जाऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पॅडला लागून वेगाने सिमारेषेच्या दिशेने गेला. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी अपील केले. ऑस्ट्रेलियाचे पंच सॅम नोगाज्सकी यांनी आफ्रिकेच्या बाजूने कौल देत बादचा निर्णय दिला. महमदुल्लाने लगेचच रिव्ह्यू घेतला. रिप्लेत चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जात असल्याचे स्पष्ट झाले. पंचांनी त्यांचा निर्णय बदलला. महमदुल्लाला जीवदान मिळाले पण धावा मिळाल्या नाहीत. चेंडू पॅडला लागून सीमारेषेपलीकडे गेला खरा पण पंचांनी बादचा निर्णय दिल्याने चेंडू डेड झाला. त्यामुळे बांगलादेशला लेगबाईजच्या चार धावा मिळू शकल्या नाहीत. या चार धावाच बांगलादेशच्या पराभवाचे कारण ठरल्या.
समालोचक आणि माजी खेळाडू अंबाती रायुडू यांनी हे अतिशय खराब पंचगिरी असल्याचे म्हटले आहे. चेंडू कोणत्याही स्थितीत यष्टीचा वेध घेणे शक्य नव्हते. बाद देण्याचा निर्णय अगम्य होता. या निर्णयामुळे बांगलादेशला हक्काच्या ४ धावा लेगबाईजच्या रुपात मिळू शकल्या नाहीत, असे रायुडू म्हणाला.
T20 World Cup 2024 : द. आफ्रिकेचा थरारक विजय, बांगलादेशचा 4 धावांनी केला पराभव…
हा नियम कोणत्याही संघाला करू शकतो बरबाद…
कोणत्याही संघाला एका क्षणात उद्ध्वस्त करणारा हा नियम आहे. समजा विश्वचषकाचा अंतिम सामना चालू आहे आणि संघाला शेवटच्या चेंडूवर फक्त 1 किंवा 2 धावांची गरज आहे आणि अशावेळी चेंडू फलंदाजाच्या पॅडवर आदळला आणि फलंदाजाने धावून दोन धावा पळून काढल्या, पण त्या वेळी क्षेत्ररक्षण करणारा संघ अपील करतो आणि फील्ड अंपायर त्यावर आऊट असल्याचा निर्णय देतो. पण, प्रत्यक्षात खेळाडू नाबाद आहे आणि रिव्ह्यू घेतल्यानंतरही तो नाॅटआऊट असल्याचे स्पष्ट होते. पण त्या रिव्ह्यूचा काही उपयोग होणार नाही कारण नियमानुसार फलंदाजाच्या धावांमध्ये 1 किंवा 2 धावा जोडल्या जाणार नाहीत आणि या नियमामुळे दुसरा संघ सामना जिंकेल.





