भोर, (प्रतिनिधी)- भोर शहरासह एसटी स्टँडमध्ये १७ ठिकाणी अनधिकृत होर्डिंग असून ही धोकादायक होर्डिंगची भोर नगरपालिकडे कोणत्याही प्रकारे परवानगी घेतलेली नाही. स्वतःच भोर नगरपालिका जागेचे मालक झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक होर्डिंग्जच्या खाली अनेकांचे धोकादायक पध्दती व्यवसाय सुरु असल्यामुळे मुंबई येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भोर शहरातील होर्डिंगचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
भोर शहरातील चौपाटी, रामबाग, एसटी स्टँडजवळील रस्ते आणि महाड नाक्याजवळ लोखंडी होर्डिंग विनापरवाना लटकले आहेत. परंतु भोर नगर परिषद संबंधित होर्डिंग्ज मालकांना दरवर्षी नोटीसा देत असून देखील परवानगी घेण्यात टाळाटाळ करीत आहे. एखादा अपघात झाल्यावर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अशा सर्व होर्डिंगधारकांच्या परवानगीची चौकशी सुरू केली आहे. सार्वजनिक व खासगी ठिकाणी असलेल्या सर्व होर्डिंगसाठी नगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. अनधिकृत असणाऱ्या होर्डिंग्जच्या जाहिरातीच्या माध्यमातून लाखो रुपये मिळवत असताना देखील त्याकडे संबंधित मालक दुर्लक्ष करीत आहेत.
शहरातील एस टी स्टँड, बाजार पेठ, चौपाटी याठिकाणी होर्डिंग्जच्या खाली अनेकांचे लहान मोठे व्यवसाय सुरु आहेत. परंतु होर्डिंग्जचे टेक्निकल आँडीट झाले की नाही, हे व्यापाऱ्यांनी पाहणे गरजेचे आहे. तरी देखील जीव मुठीत धरुन धोकादायक पध्दतीने व्यवसाय करीत आहेत.
भोर शहरात ७ तर एस टी स्टँड परिसरात १० अनाधिकृत होर्डिंग्ज असून त्यांना भोर नगरपालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. १० दिवसांत टेक्निकल आँडीट करुन घेऊन तसा रिपोर्ट नगरपालिकेला सादर करावा. अन्यथा नोटीसाच्या मुदतीनंतर संबधित होर्डिंग्जवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी येणारा खर्च त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे. – श्रीराम पवार, मुख्याधिकारी, नगरपरिषद, भोर