T20 World Cup 2024 : द. आफ्रिकेचा थरारक विजय, बांगलादेशचा 4 धावांनी केला पराभव…

T20 World Cup 2024 (SA vs BAN) : टी-20 विश्वचषक 2024 चा 21 वा सामना दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 4 धावांनी पराभव केला आहे.
बांगलादेश जेव्हा 114 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरला तेव्हा संघाची सुरुवात खूपच खराब झाली. तर ताहिद हृदय आणि महमुदुल्लाह यांच्यात 44 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. बांगलादेशकडून हृदयने सर्वाधिक धावा केल्या, त्याने 34 चेंडूत 37 धावा केल्या. मात्र अखेरच्या षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेने केलेल्या प्रभावी गोलंदाजीमुळे बांगलादेशला अवघ्या 4 धावांनी सामना गमवावा लागला.
🇿🇦 win a thriller in New York 🔥
A skilful bowling display against Bangladesh helps them defend the lowest total in Men’s #T20WorldCup history 👏#T20WorldCup | #SAvBAN | 📝: https://t.co/XCZhIYVOHi pic.twitter.com/Kak9T5Jq0S
— ICC (@ICC) June 10, 2024
या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने बांगलादेशचा पराभव करत सुपर-8 मध्ये आपले स्थान पक्के केले. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ सुपर-8 मध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. हा सामना अत्यंत कमी धावसंख्येचा होता, जिथे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत संघाला विजयापर्यंत नेले. ‘ड’ गटात दक्षिण आफ्रिका 3 विजय आणि 6 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर बांगलादेशला या आवृत्तीत पहिला पराभव स्वीकारावा लागला आहे.
114 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 20 षटकात 7 गडी गमावून 109 धावाच करू शकला. यासह दक्षिण आफ्रिकेने टी-20 विश्वचषकात सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करण्याचा विक्रम केला. याआधी टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 119 धावसंख्येचा बचाव केला होता. रविवारीच टीम इंडियाने ही कामगिरी केली होती. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज केशव महाराज होते, त्यांनी 4 सामन्यात 27 धावांत 3 बळी घेतले. तर कागिसो रबाडा आणि एनरिक नोरखिया यांना प्रत्येकी 2-2 यश मिळाले.
तत्पूर्वी, या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 20 षटकांत 6 बाद 113 धावा केल्या होत्या. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी 2007 मध्ये भारताविरुद्ध संघाने 20 षटकात 9 गडी गमावून 116 धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेची सुरुवात फारच खराब झाली, पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेने 25 धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. पण हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांच्या 79 धावांच्या भागीदारीने संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. हेनरिक क्लासेनने 44 चेंडूत 46 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने 2 चौकार आणि 3 षटकार ठोकले. दुसरीकडे, डेव्हिड मिलरने 38 चेंडूत 29 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या सामन्यात मार्को जॅन्सन आणि केशव महाराज यांनी अनुक्रमे पाच आणि चार धावा केल्या. दोघेही नाबाद राहिले.
पॉवरप्ले ओव्हर्समध्ये बांगलादेशने चांगली गोलंदाजी केली, पण त्यानंतर डेव्हिड मिलनर आणि हेनरिक क्लासेन यांनी फलंदाजीवर वर्चस्व गाजवले. बांगलादेशकडून तनझिमने तीन तर तस्किनने दोन गडी बाद केले. त्याचवेळी रिशाद हुसेनला यश मिळाले.





