Pappu Yadav| बिहारमधील पूर्णिया येथील अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दबंग प्रतिमा असलेले पप्पू यादव यांच्यावर एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. पूर्णिया येथील एक फर्निचर व्यावसायिक राजा याने यासंदर्भात मुफसिल पोलीस ठाण्यात पप्पू यादवविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
एफआयआरमध्ये राजाने आरोप केला आहे की, पप्पू यादव आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. पूर्णियामध्ये राहायचे असेल तर एक कोटी रुपये द्यावे लागतील. ही रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. मात्र, पप्पू यादव यांनी हा निराधार आरोप असल्याचे म्हटले आहे.
फर्निचर व्यावसायिक राजा यांचे म्हणणे आहे की, खासदार पप्पू यादव आणि त्यांच्या साथीदारांनी फोन आणि व्हॉट्सएप कॉलद्वारे त्यांच्याकडूनदका लाखापासून सुरुवात करत आता एक कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. याचा उल्लेख त्याच्या एफआयआरमध्येही करण्यात आला आहे. पूर्णियाच्या पोलिसांनी खंडणीबाबत एफआयआर दाखल केल्याबाबत पुष्टी केली आहे.
फर्निचरचा व्यवसाय करणाऱ्या तक्रारदार राजाने आपल्या जीवाच्या सुरक्षेचे आवाहन केले आहे. त्यांना नियमानुसार सुरक्षा पुरविण्यात आली आहे. तर खासदार पप्पू यादव यांनी एक्सवर पोस्ट करत हे संपूर्ण प्रकरण निराधार असल्याचे म्हटले आहे. हा आरोप म्हणजे आपल्या वाढत्या लोकप्रियतेला कलंक लावण्याचे षडयंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सुप्रीम कोर्टाच्या अंतर्गत निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि जो दोषी असेल त्याला फाशी देण्यात यावी, अशी मागणी यादव याने केली आहे.
हेही वाचा:
काय सांगता..! शेतात वीज पडली अन् जमिनीतून सुरु झाला निळ्या पाण्याचा प्रवाह; पाहा Video