पुसेगाव -करोना प्रसार रोखण्यासाठी पुसेगाव ग्रामपंचायतीने भाजी मंडईचे स्थलांतर सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोरील जुन्या यात्रास्थळावर केले आहेत. मंडईमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे फक्त पुसेगाव परिसरातील छोट्या गावातील स्थानिक शेतकरी व व्यावसायिकांनाच भाजीपाला विक्रीची परवानगी देऊन त्यांना अर्थार्जनाची संधी देण्यात आल्याने स्थानिक शेतकरी व व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
पंधरा दिवसांपूर्वी पुसेगाव येथील मंडई बाजारपटांगण तसेच पुसेगाव पोलीस ठाणे ते छत्रपती शिवाजी चौक या दरम्यान रस्त्यालगत भरविली जात असे, संचारबंदी व लॉकडाऊनच्या कालावधीत सामाजिक सुरक्षिततेचे पालन करण्यासाठी भाजीविक्रत्यांच्या दुकानासमोर ग्रामपंचायतीतर्फे सुरक्षित अंतराच्या खुणा करण्यात आल्या होत्या.
परंतु सातार-पंढरपूर या राज्यमार्गावरुन दूरवरुन येणारी परगावची वाहने या रस्त्यावर थांबून त्यामधील प्रवाशीही या मंडईत येत असल्याने करोना प्रसाराचा धोका संभावत असल्याने सरपंच मनिषा पाटोळे, उपसरपंच चंद्रकांत जाधव, श्री. सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव व ग्रामपंचायत सदस्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या मंडईचे जुन्या यात्रास्थळावर स्थलांतर केले. दरम्यान नवीन जागेत आलेल्या या मंडईत व्यावसायिक व ग्राहक यांनी सामाजिक अंतराची पायमल्ली करु नये यासाठी व्यावसायिकांना ट्रक्टरच्या नांगराद्वारे आखणी करुन विशिष्ट जागेतच बसण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
या नव्या जागेतील मंडईत येण्यासाठी तीन ते चार प्रवेश मार्ग आहेत. यापैकी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरुन प्रवेश करण्याऱ्या पुसेगाव-फलटण मार्गावरुन फलटण, वडूज व अन्य लांबच्या गावातील भाजीपाला विक्रेतेही येथे व्यवसायानिमित्त येत असल्याने अशा विक्रेत्यांमुळेही करोना प्रसार होण्याची शक्यता असल्याने पुसेगाव ग्रामपंचायतीने बांधकाम कार्यालयासमोरील रस्ता बंद करुन लांबच्या गावाहून येणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रतिबंध केले आहे.