नवी दिल्ली – सन 2020 मध्ये गलवान खोऱ्यातील चकमकीत शहीद झालेले नाईक दीपक सिंग यांच्या पत्नी रेखा सिंग यांना भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना पूर्व लडाखमधील चीन सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील फ्रंटलाइन तळावर तैनात करण्यात आले आहे, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
लेफ्टनंट रेखा सिंग यांनी शनिवारी चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी मध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. शहीद नाईक सिंग हे बिहार रेजिमेंटच्या 16 व्या बटालियनचे होते आणि त्यांना 2021 मध्ये मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले आहे. गलवान खोऱ्यातील चीनी जवानांबरोबरच्या संघर्षात त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनेही बहादुरी दाखवत लष्करी सेवेत रूजू होण्याची इच्छा व्यक्त केली होती.