नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या पोलीस कोठडीची मुदत आज (दि.23) संपत असल्याने त्याला पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे बोठेच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ होते की त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या शनिवारी (दि.20) बोठे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यास पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी बोठे याच्याकडे हत्येसंदर्भात अजूनही काही चौकशी करावयाची असून, या कटात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संशयित आरोपी बोठे याला पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश द्यावेत, असा युक्तीवाद तपासी पोलीस अधिकार्यांतर्फे न्यायालयात करण्यात आला होता.
दरम्यान, हत्येबाबत संशयित आरोपी सागर भिंगारदिवे याने सगळा घटनाक्रम सांगितला आहे. संशयित आरोपी बाळ बोठे यानेही पोलिसांना तपासात सहकार्य केलेले आहे. बोठेच्या घराची झाडाझडती देखील घेण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तीवाद बोठे याच्या वकीलांनी न्यायालयात केला होता. दरम्यान, दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बोठेला पुन्हा मंगळवारपर्यंत (दि.23) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.