पीएमओच्या निर्णयाविरोधातील अर्जावर जून मध्ये सुनावणी
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात दाखल झालेल्या भ्रष्टाचार तक्रारींचा तपशील देण्यास पंतप्रधान कार्यालयाने नकार दिला आहे. त्या नकाराला आव्हान देणारी याचिका केंद्रीय दक्षता आयोगाकडे सादर झाली आहे त्यावर जून महिन्याच्या मध्यालाच सुनावणी घेता येईल असे केंद्रीय दक्षता आयोगाने म्हटले आहे.
संजीव चतुर्वेदी नावाच्या एका सरकारी अधिकाऱ्याने पंतप्रधान कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात अर्ज करून केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या किती तक्रारी दाखल झाल्या आहेत याचा तपशील मागवला होता. पण पंतप्रधान कार्यालयाने तो तपशील देण्यास नकार दिला होता. त्यामुळे चतुर्वेदी यांनी दक्षता आयोगाकडे या संबंधात धाव घेतली होती.
मंत्र्यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि अन्य सार्वजनिक तक्रारी मोठ्याप्रमाणात दाखल झाल्या असल्या तरी त्यातील भ्रष्टाचाराच्या संबंधात तक्रारी किती आणि सामान्य स्वरूपाच्या तक्रारी किती याचे बायफरकेशन करणे जिकीरीचे असल्याचे सांगत तसा तपशील देता येणार नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे माहितीच्या अधिकारातील कलम 7(9) अन्वये अशी माहिती देता येणार नाही असे पीएमओचे म्हणणे होते. पण अर्जदार चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार कलम 7(9) अंतर्गत ही माहिती नाकारता येत नाही. दक्षता आयोगाने दोन्ही बाजुंचे म्हणणे आज ऐकून घेतले आणि त्यावर 17 जून रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय आज दिला.