इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर त्यांच्याच पूर्वपत्नी रेहम खान यांनी अलिकडेच कडवट भाषेत टीका केली होती. आपले चारित्र्यहनन करण्यासाठी रेहम खान यांनी आपल्या शत्रूकडून पैसे घेतले होते, अशा शब्दात इम्रान खान यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पहिल्या पत्नी जमैमा यांनी इस्लाम धर्म स्विकारला होता. त्या पाकिस्तानमध्येही ही येऊन राहिल्या होत्या. तरिही शरीफ यांच्या गोटातून जमैमा यांच्या बदनामीची मोहिम राबवली गेली होती. त्याच प्रमाणे रेहम यांना हाताशी धरून आपल्या बदनामीची मोहिम राबवली जात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. लाहोरमध्ये पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना इम्रान खान यांनी जमैमा गोल्डस्मिथ आणि रेहम खान या दोघी पूर्वपत्नींच्या नावाचा उल्लेख न करता भाष्य केले.
ईदनंतर शरीफ यांच्या गोटाकडून आपल्या चारित्र्यहननाची मोहिम सुरू केली जाईल. अशीच बदनामी पूर्वी बेनझीर भुट्टो यांचीही करण्यात आली होती. विदेशातून पाकिस्तानात आलेल्या आणि इस्लाम स्विकारलेल्या महिलेबद्दलही (जमैमा) अशीच बदनामी केली गेली होती. तिला ज्यू संबोधले गेले. तिच्यावर खोटी प्रकरणे दाखल केली गेली. 2018 च्या निवडणूकीपूर्वी एक पुस्तक लिहीणाऱ्या महिलेलाही (रेहम खान) अशीच बदनामी करण्यासाठी पैसे दिले गेले, असे इम्रान खान म्हणाले.
रेहम खान यांनी इम्रान यांच्या या टीकेला उपरोधिक प्रत्युत्तर दिले आहे. जे पैसे विरोधकांकडून दिले गेले, ते इम्रान यांनी स्वतःकडेच ठेवले का? त्यांच्याशी निकाह करण्यासाठी त्यांनी किती पैसे दिले हे पण विचारायला सांगावे, असे रेहम यांनी ट्विटरवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.