प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे शहरातील कोथरुड, येरवडा आणि पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी येथील पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) तीन इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव म्हाडाने राज्य सरकारला मान्यतेसाठी पाठविला असून त्याला मान्यता मिळाल्यास या इमारतींचा पुनर्विकास शक्य होणार आहे.
म्हाडाच्या जुन्या इमारतींपैकी एका इमारतीचा पुनर्विकास करणे शक्य नव्हते. त्याला परवानगी मिळत नव्हती. त्यावेळी अनेक सोसायट्यांनी एकत्र येऊन पुनर्विकासाची परवानगी मागितल्यास पुनर्विकास शक्य होत होता. मात्र, या सर्व सोसायट्या एकत्र येण्यास अडचण होत होती. त्यामुळे म्हाडांच्या सोसायट्यांचा पुनर्विकास होत नव्हता.
आता शिंदे फडणवीस सरकारने म्हाडाच्या एका इमारतींचा पुनर्विकासाचा पूर्वीचा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे एका इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर्वीच्या धोरणानुसार म्हाडाच्या एकेका इमारतींचा पुनर्विकास करता येत नव्हता. आता एका इमारतींच्या पुनर्विकासाला मान्यता मिळाली आहे. त्यानुसार, दहा प्रस्ताव म्हाडाला प्राप्त झाले होते.
त्या प्रस्तावांची छाननी केली असता त्यापैकी तीन प्रस्ताव पूर्ण होते. त्यामध्ये पुणे शहरातील कोथरुड, येरवडा आणि पिंपरी चिंचवड येथील मोरवाडी येथील इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. मोरवाडीमध्ये 208, कोथरुडमध्ये 54 आणि येरवड्यामधील 56 अशा 318 घरांच्या पुर्नविकासाचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती म्हाडाच्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी दिली.