पाकिस्तानी ड्रोनच्या घुसखोरीनंतर पाऊल
जम्मू : भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी सीमेच्या (आयबी) आणि नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत रेड ऍलर्ट जारी केला आहे. त्यानुसार नापाक हालचालींवर बारीक नजत ठेवण्याचा आदेश जवानांना आणि सीमा ठाण्यांना देण्यात आला आहे.
भुयारे शोधण्यासाठी जोरदार मोहीम
जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवादी भुयारांचा वापर करू शकतात. ती शक्यता ध्यानात घेऊन बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेलगत भुयारे शोधण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. जम्मूच्या आर.एस.पुरा क्षेत्रात काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी तरूणाला अटक करण्यात आली. त्यानंतर 180 किलोमीटरवर पसरलेल्या सीमेलगत भुयारे शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लष्कर आणि बीएसएफने 2012 पासून आतापर्यंत 6 भुयारे शोधून काढली. पाकिस्तानी हद्दीतून खोदण्यात आलेल्या त्या भुयारांचा वापर दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्यासाठी केला जात असल्याचे निष्पन्न झाले.
पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पोहचवण्यासाठी पाकिस्तानने चीनी ड्रोनचा वापर केल्याची घटना उघड झाली. भारतात दहशतवादी कारवाया घडवण्यासाठीच ती उठाठेव करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. भारतात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके पाठवण्यासाठी पाकिस्तानने नवी पद्धत अवलंबल्याची गंभीर दखल भारताने घेतली आहे. त्यातून अतिसतर्क राहण्याचे आदेश देण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. आयबी आणि एलओसीलगत असणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी, पूँच, बारामुल्ला आणि कुपवाडा या जिल्ह्यांत बारीक पाळत ठेवण्यास सांगण्यात आले आहे. गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच, भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करणारे ड्रोन पाडण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.