इस्लामाबाद – पाकिस्तानमधील भोंग येथील एका मंदिरात तोडफोडीच्या घटनेनंतर पाकिस्तानने भारताच्या निषेधानंतर नमते घेतले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंदिरात झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा निषेध करत मंदिर पुन्हा बांधण्याचे आश्वासन दिले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका ट्विटमध्ये आपला मुद्दा मांडला आहे. इम्रान खान यांनी ट्विट करून म्हटले आहे की, भोंग येथील गणेश मंदिरावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. या मंदिराची पुनर्बांधणी सरकार करणार आहे.
मी पंजाब आयजीला आधीच सांगितले आहे की या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील दिला आहे.
भारताने या संपूर्ण घटनेवर तीव्र आक्षेप व्यक्त करत पाकिस्तानी उच्चायुक्ताच्या प्रभारींना बोलावले होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले होते की, पाकिस्तानातील अल्पसंख्यांक समुदायाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर होत असलेल्या हल्ल्यांबाबत भारताने पाकिस्तानी मुत्सद्यालाही गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
अरिंदम बागची म्हणाले होते की, येथील पाकिस्तानी उच्चायुक्ताच्या प्रभारींना पाचारण करण्यात आले आणि पाकिस्तानमधील या निंदनीय घटनेवर आणि अल्पसंख्याक समुदायाचे धार्मिक स्वातंत्र्य आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर सतत होणारे हल्ले यावर तीव्र चिंता व्यक्त केली.
दरम्यान, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील या मंदिरातील विध्वंस घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये काही लोक हातात काठ्या आणि विटा घेऊन मंदिरात ठेवलेल्या मूर्तींचे नुकसान करताना दिसत आहेत.