पुस्तकांचं गाव, भिलार -करोना काळातही पुस्तकांचं गाव, भिलार या प्रकल्पाच्या माध्यमातून वाचन प्रेरणा दिनानिमित्त (15 ऑक्टोबर) पुस्तकांची आणि वाचनाची आवड वाढवणारे उपक्रम योजण्यात आले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत हे “पुस्तक वाचना’चे आवाहन समाजमाध्यमांद्वारे (सोशल मीडियाद्वारे) पोहोचवण्यात आले आहे. तसेच वाचकांनी आपल्या वाचनाचा तपशील (आपले नाव, गाव, वाचनाचा वेळ, पुस्तक-लेखक- प्रकाशनाचे नाव, पृष्ठ संख्या, वाचन करतानाचे छायाचित्र इ… pustakangaav.rmvs@gmail.com या इ-पत्त्यावर किंवा 9545126007 या व्हॉट्सअ्प क्रमांकावर पाठवावेत, असेही कार्यालयाने कळवले आहे.
गेल्या 5 वर्षांपासून राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ.ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन (15 ऑक्टोबर) वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जात आहे. संपूर्ण राज्यातील उत्साही आणि जाणकार वाचकांमुळे वाचन प्रेरणा दिन हा आता एक लोकोत्सव झाला आहे. पुस्तकांचं गाव, भिलार येथेही गेली 5 वर्षे वाचनध्याससारखे सलग वाचनाचे उपक्रम योजण्यात आले होते. करोना-संकटामुळे अनेक मर्यादा असल्याने यंदा वेगळ्या, अनोख्या पद्धतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येत आहे.
व्हर्च्युअल अभिवाचन आणि व्याख्यानही…
प्रकल्प कार्यालयाच्या वतीने व्हर्च्युअल अभिवाचन आणि व्याख्यानही योजण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक पुस्तकप्रेमी वाचक (सुमारे 20) त्यांच्या आवडत्या पुस्तकाचे गुरुवारी प्रत्येकी 3 मि. अभिवाचन करणार आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. कृष्णात खोत अभिवाचकांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सकाळी 10.30 ते 12.30 या वेळात अभिवाचन व व्याख्यान होणार असून, पुस्तकांचं गाव प्रकल्पाच्या फेसबुक पेजवर व्हर्च्युअल कार्यक्रमाची लिंक (दुवा) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.