सातारा – ५० वर्षाच्या परंपरेचे व नववर्षाचे अनोखे स्वागत म्हणून सतीश रावखंडे यांनी चक्क सातारकरांना मोफत खारे शेंगदाणे वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाची शहरात चांगलीच चर्चा रंगली असून चोखंदळ नागरिकांनी नवं वर्षासोबत ५० वर्षांच्या खारे शेंगदाणे विक्रीच्या परंपरेचे प्रत्यक्ष भेट देत कौतुक केले.
सातारा शहरातील सुप्रसिद्ध अशा सतीश रावखंडे यांच्या खारेदाणे स्टॉलवर नव वर्षाच्या निमित्ताने तसेच त्यांच्या विक्री व्यवसायाला तब्बल पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी हा उपक्रम केला असल्याची माहिती समजली. त्यांनी सातारकरांना सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत मोफत खारेदाणे खाऊ घालण्याचा अनोखा विक्रम केला., सकाळपासूनच राजवाडा बसस्थानक परिसरातील स्टॉलवर सातारकरांनी खारेदाणे घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
उद्योजक असलेल्या रावखंडे यांनी कष्ट घेत अडचणींचा सामना करत शेंगदाणे व्यवसायात आपली ओळख निर्माण केली. यामध्ये त्यांना विविध पुरस्कार देखील प्राप्त झाले. साताऱ्यात खारे शेंगदाणे म्हंटल की रावखंडे यांचे नाव आपोआप तोंडात येते. त्यांच्या खारेदाण्यांची चव चोखंदळ सातारकर व पर्यटकांच्या जिभेवर तरळत असते. नवं वर्षाचे स्वागत म्हणून एक जानेवारीला सकाळी दहा ते रात्री दहा यावेळेत मोफत खारेदाणे त्यांनी नागरिकांना वाटले.