रविना टंडन लवकरच आजी बनणा आहे. तिची मुलगी छायाच्या “बेबी शॉवर’च्या कार्यक्रमाचे फोटो तिने अलिकडेच शेअर केले आहेत. हे फोटो रविनाची चांगली मैत्रिण पूजा मखिजाने शेअर करून घेतले आहेत. छाया ही रविनाने दत्तक घेतलेली मुलगी आहे. तिच्या बेबी शॉवरसाठी रविनाने जेवढा उत्साह दाखवला, तो विलक्षण आहे. छायाला वाढवताना रविनाने घेतलेली काळजी आणि दिलेले प्रेम खऱ्या आईसारखेच आहे, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रविनानेही या पोस्टला उत्तर देऊन आभार मानले आहेत. वयाच्या अवघ्य 21 व्या वर्षी रविनाने 11 वर्षाची पूजा आणि 8 वर्षाची छाया या दोन मुलींना दत्तक घेतले होते. या दोन्ही मुली रविनाच्या नातेवाईकांच्या मुली आहेत. पालकांचा मृत्यू झाल्यावर या मुलींना रविना आपल्या घरी घेऊन आली. स्वतःच्या लग्नाच्यावेळी आपल्याबरोबर दोन्ही मुलींनाही बरोबर नेण्याची अट तिने नवऱ्यासमोर ठेवली होती. तिच्या नवऱ्याने ही अट मान्य केली.
तिच्या सासरकडच्यांनीही काही आक्षेप घेतला नाही. रविनाला स्वतःच्या दोन कन्या आहेत. पण त्या अजून लहान आहेत. पूजा आणि छायाला रविनाने आपल्या कन्याच मानल्या असल्यामुळे लग्नाच्या 15 वर्षांतच ती आजी बनणार आहे.